Monday, July 15, 2024

  वृत्त क्र. 595

शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षक-पालक संवाद घडवावा

-शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे

नांदेड दि. 15 जुलै : जिल्ह्यातून शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी मुख्याध्यापकांनी पुढाकार घेऊन शिक्षक पालक संवाद घडवावा, असे मत लातूरचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी व्यक्त केले. नांदेड जिल्हयातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या सहविचार सभेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

विष्णूपूरी येथील ग्रामीण टेक्नीकल अँड मॅनेजमेंट कँपस येथे नुकतेच शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नांदेड व ग्रामीण टेक्नीकल अँड मॅनेजमेंट कँपस विष्णूपूरी नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय सहविचार सभेतून नांदेड जिल्हयातील सर्व मुख्याध्यापकांना ते मार्गदर्शन करत होते.

शाळेतून शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी व क्लासेसकडे वळलेला विद्यार्थ्यांचा ओढा शाळांकडे पुन्हा वळविण्यासाठी शिक्षकांनी शाळातून प्रात्यक्षिक करवून घेत शिक्षणात रस निर्माण करावा असे ते यावेळी म्हणाले. अध्यापनात रूची निर्माण करण्यासाठी नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर वर्गातून करावा. प्रसंगी शैक्षणिक अडचणींवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

यावेळी लातूरचे सहायक शिक्षण उपसंचालक डॉ. दत्तात्रय मठपती यांनी कॉपीमुक्तीचा नांदेड पॅटर्न कायम ठेवण्यासाठी उपस्थितांना प्रोत्साहित केले. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांस शिकवणी वर्गास जाण्याची वेळ का येते यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज विषद केली. अनेक शाळांतील प्रयोगशाळा या देखाव्याची वास्तू बनल्या असून त्या पुनरूज्जवीत करण्याची आवश्यकता त्यांनी पटवून सांगितली.

यावेळी योजना विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी इयत्ता 10 वी व 12 वीमध्ये अंतर्गत गुणांच्या जोरावर पास होणे अगदी सोपे बनले असून देखील विद्यार्थी अगदी 5 ते 10 गुण मिळवू शकत नसतील तर कॉपी करण्याचा प्रयत्न करीत असतील तर यास कुठेतरी शिक्षकच जबाबदार नाही का यासाठी आत्म्परीक्षण होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. आपल्या शाळेतील गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी अध्यापनात रूची निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

अध्यक्षीय समारोपतून माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी उपस्थितांना प्रवेश प्रक्रियेतील नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याची आवाहन करीत आभार व्यक्त केले. यावेळी मंचावर उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे, शिक्षण विस्तार अधिकारी कृष्णकुमार फटाले, सहायक शिक्षण उपनिरीक्षक हनूमंत पोकले, कार्यालयीन अधिक्षक शंकर पूपूलवाड, जुक्टा संघटनेचे विभागीय मार्गदर्शक मुकूंद बोकारे, जिल्हा सचिव नारायण गाडवे व आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय पवार आदिंची उपस्थिती होती. सूत्रसंचलन डॉ ओमप्रकाश दरक यांनी केले.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...