Thursday, May 2, 2024

 वृत्त क्र. 401

लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान

 

10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार

 

नांदेड दि. 2 मे : 26 एप्रिल रोजी 16- नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये यशस्वीपणे निवडणुकीचा डोलारा सांभाळणाऱ्या दहा हजारावर कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यस्ततेतही मताधिकार सुलभतेने बजावल्याचे पुढे आले आहे. कक्षाच्या नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी ही माहिती दिली आहे.

 

ज्या कर्मचाऱ्यांची निवडणूक कार्यासाठी नियुक्ती 16 नांदेड लोकसभा क्षेत्रात आहे. परंतु त्यांचे नाव 16 नांदेड लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघ जसे की भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर,मुखेड या सहा मतदारसंघात येत होते. अशा निवडणूक कामात असलेल्या नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना नमुना 12 -अ भरल्यानंतर संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी इडीसी (इलेक्शन ड्युटी सर्टीफिकेट ) प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले.

 

इडीसी प्रमाणपत्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईव्हीएमद्वारे प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावता येतो. या निवडणूक आयोगाच्या प्रयोजनाचा फायदा या वर्षी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे.

 

त्यामुळे जिल्ह्यात ठीकठिकाणी नियुक्त झालेल्या आणि ज्यांना इडीसी अर्ज मंजूर करण्यात आले, अशा 5762 कर्मचाऱ्यांपैकी 5537 कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. विशेष म्हणजे आजपर्यंतच्या पार पडलेल्या निवडणुकीतील ही संख्या सर्वाधिक आहे.

 

तसेच जे अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती 16-नांदेड लोकसभा (सहा विधानसभा क्षेत्रा बाहेर) मतदार संघाच्या बाहेर होती. मात्र त्यांचे नाव या सहापैकी एका विधानसभा क्षेत्रात होते. त्यांनाही फॉर्म 12-ड द्वारे टपाली मतपत्रिकाची मागणी करता येत होती. तसेच फॉर्म 12 ड द्वारे जेष्ठ नागरिक, दिव्यांग व अत्यावश्यक सेवातील कर्मचारी यांना देखील टपाली मतपत्रिकाद्वारे मतदान करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. या संधीचा फायदा देखील 5376 टपाली मतपत्रिका मंजूर झाल्या पैकी 4264 कर्मचारी मतदार यांनी घेतला आहे. त्यांना आपल्या व्यस्ततेतही मतदान करता आले आहे.

 

निवडणूक आयोगाच्या या वेळेच्या बदलानुसार टपाली मतपत्रिका पोस्टाद्वारे पाठविण्यात आल्या नाहीत. तशी स्वीकृत करण्याची सुविधा नसल्याने प्रत्यक्ष टपाली मतपत्रिका ताब्यात घेऊनच त्याच ठिकाणी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

याशिवाय पारंपारिक पद्धतीने सैनिकांसाठी सर्विस वोटर सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. त्याद्वारे 1689 सैनिकांना टपाली मतपत्रिका ऑनलाईन निर्गमित करण्यात आल्या आहे. त्यापैकी 480 मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत.

 

एकूणच 16 नांदेड लोकसभा मतदारसंघातील जवळपास दहा हजारापेक्षा जास्त निवडणूक कर्मचारी अधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. टपाली मतपत्रिका कक्षाच्या नोडल अधिकारी श्रीमती संगीता राठोड यांनी ही माहिती दिली आहे.

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...