Monday, April 15, 2024

 वृत्‍त क्र. 344 

उष्माघातापासून विद्यार्थ्यांचा बचाव करण्यासाठी शाळा, 

महाविद्यालयांनी उपाययोजना करण्यात : जिल्हाधिकारी

नांदेड दि. 15 :- संभाव्य उष्णतेच्या लाटेच्या होणाऱ्या उष्माघातापासून विद्यार्थ्यांचा बचाव करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांच्या प्रमुखांनी आवश्यक ती काळजी व उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी दिल्या आहेत. 

जिल्ह्यात परीक्षा संपलेल्या असताना सुध्दा काही शाळांमध्ये वर्ग सुरु असल्याच्या सूचना जिल्हा नियंत्रण कक्षास
प्राप्त झाल्या आहेत. काही सीबीएसई मंडळाच्या शाळा 30 एप्रिलपर्यत सुरु राहणार असल्याचे निदर्शनास आले आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढत असून तापमान 40 अंशाच्या वर जात आहे. संभाव्य उष्णतेच्या लाटेच्या उष्माघातापासून विद्यार्थ्यांचा बचाव करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबतचे आदेश आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जिल्हा प्रशासनाच्यावतीने निर्गमित केले आहेत.

जिल्ह्यातील सर्व शाळा ,महाविद्यालयांनी शालेय परिपाठ सकाळी कमीत कमी वेळेत व राष्ट्रगीत ,प्रतिज्ञा असा मर्यादीत ठेवावा. परिपाठ शक्यतो सावलीच्या ठिकाणी घेण्यात यावा. शाळेची वेळ वर्ग खोल्याचे योग्य नियोजन करुन सकाळच्या सत्रात मध्यान्हापूर्वी ठेवण्यात यावे. शालेय विद्यार्थ्यांचे मैदानी खेळ, खेळाच्या तासीका, पि.टी., कवायत इ. उन्हाच्या कालावधीत आयोजीत करण्यात येवू नये. शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या आवारात मुबलक प्रमाणात स्वच्छ पिण्याचे पाणी, पंखे, प्रथमोपचाराची सुविधा शाळा व्यतवस्थापनाने उपलब्ध करुन द्यावी. जे विद्यार्थी, स्कुल बस अथवा इतर वाहनांनी शाळेत ये-जा करतात त्यांच्यासाठी व पालकांसाठी वाहन येईपर्यंत थांबण्यासाठी शाळेच्या आवारात शेड,सावलीची व्यवस्था करावी. वाढते तापमान लक्षात घेता शाळेच्या दर्शनी भागात, स्कुलबसमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सुविधा बाबतचे क्रमांक ठळक अक्षरात प्रदर्शीत करावे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थी स्कुलबसद्वारे ये-जा करतात अशा सर्व स्कुलबस मध्ये चालकासोबत एक मदतनीस ठेवण्यात यावा, शालेय कालावधी दरम्यान उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता कोणताही विद्यार्थी, शिक्षक अथवा कर्मचारी यांना उष्माघाताचा त्रास होणार नाही यादृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना शाळा व्यअवस्थापनाने कराव्यात. या व्यतिरिक्त उष्ण‍तेच्या लाटेच्या कालावधीत उष्माघातापासून विद्यार्थ्यांचा बचाव करण्यासाठी आवश्यक असतील अशा उपाययोजना शाळा व्यवस्थापनाने कराव्यात. शक्य असल्यास मुख्याध्यापकांनी त्यांचे स्तरावर शाळेला सुट्टी देण्याचा निर्णय घ्यावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आल्या आहेत.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 52 बारावीच्या मुलांसाठी यावर्षी हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध ; शिक्षण मंडळाचा निर्णय माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून हॉल ति...