Monday, April 15, 2024

वृत्‍त क्र. 343

 दुसऱ्या प्रशिक्षणास आले 'देश का महात्यौहारचे स्वरुप' 

नांदेड दि. १५ एप्रिल – सकाळचे प्रसन्न वातावरण, विविध सूचना बँनरने अचूक सजलेले उपस्थिती टेबल, उत्साही व तत्पर कर्मचारी, भव्य एलईडी स्क्रीन सह हारीने मांडलेल्या खुर्च्यासह सुसज्ज झालेले सभागृह, अधिकारी, मतदान अधिकारी, स्क्रीनवर भारत निवडणूक आयोगाचे दाखविलेले चिन्ह व छायाचित्र, उपस्थिती नोंदविणारे मतदान अधिकारी व कर्मचारी, टपाली मतदानासाठी सज्ज झालेले केंद्र, प्रत्यक्ष मतदान यंत्र प्रशिक्षणासाठी योग्य पध्दतीने तयार करण्यात आलेले रुम्स, दुचाकी व चारचाकीची करण्यात आलेली सुटसुटीत रचना, वातावरणात थंडावा निर्माण होण्यासाठी लावण्यात आलेली कुलर यंत्रणा, ज्यामुळे प्रशिक्षण घेणे व देणेसाठी सुसह्यतीचे व समाधानाची भावना असे दुसऱ्या प्रशिक्षणास आले देश का महात्यौहारचे स्वरूप. 16 नांदेड लोकसभातंर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे द्वितीय प्रशिक्षण आज 15 व 16 एप्रिल रोजी गुजराती हायस्कूल, वजिराबाद, नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. 

सकाळ व दुपार अशा दोन सत्रात प्रशिक्षणाची आज सुरुवात झाली. यावेळी प्रशिक्षण मंचावर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 087 नांदेड दक्षिण तथा उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार उमाजी बोथीकर, प्रशिक्षण प्रमुख तथा नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू व संघरत्न सोनसोळे, प्रशिक्षण सहाय्यक यांची उपस्थिती होती. 

प्रशिक्षणाची सुरुवात भारत निवडणूक आयोगाच्यावतीने तयार केलेल्या उपयुक्त अशा पिपिटीद्वारे करण्यात आली. या पिपिटीमध्ये संपूर्ण मतदान प्रक्रिया प्रत्यक्ष विविध दाखले व उदाहरणे देवून समजून देण्यात आल्यामुळे प्रशिक्षणार्थांना प्रक्रिया योग्यप्रकारे समजण्‍यास सुलभ झाली. पिपिटी नंतर उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी अत्यंत सविस्तरपणे विविध क्लिपद्वारे मतदान साहित्य हस्तगत करण्यापासून मतदान घेवून परत येईपर्यंतचे मार्गदर्शन केले. इव्हिएम यंत्र, कंट्रोल युनिट, व्हिव्हिपँटची जोडणी, सिलींग प्रक्रिया, आदर्श मतदान केंद्र रचना, विविध फाँर्म्‍स , माँकपोल, प्रदत्त मत, मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था, संवेदनशील केंद्र कोणती, अशा केंद्राची वेब कास्टिंग करणे, मतदार सहाय्यता कक्षाद्वारे मतदारास कशी मदत केली जाईल, किमान सुविधा कोणत्या, प्रत्यक्ष मतदान सुरु करण्यापूर्वी कोणती महत्त्वाची कामे करणे आवश्यक आहेत, मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी डायरी,मतदान अधिकारी एक, दोन,तीनची कार्ये, विविध नमुने अशा अनेक बाबींवर भरीव मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामध्ये अनेक प्रशिक्षणार्थींच्या शंकांचे अचूक निरसन केल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षिण देण्यात आले. हँन्ड्स आँन ट्रेनिंगच्या टप्प्यात मतदान यंत्र हाताळू देण्यात आल्यामुळे अनेक अडचणीवर मात करण्यात आली. सकाळ सत्रात 360 पैकी 351 मतदान अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सत्राचे सुत्रसंचालन प्रशिक्षण विभागाचे सदस्य संजय भालके यांनी केले. 

87 नांदेड दक्षिण, 86 नांदेड उत्तर, 89 नायगाव 90 देगलूर 85 भोकर 91 मुखेड या सहा विधानसभा मतदारसंघाच्या इडीसीचे वाटप करण्यात आले. पोस्टल बँलटसाठी हदगाव व किनवट येथील कर्मचाऱ्यांचे मतदान कक्ष प्रभू कपाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उभारुन मतदान घेण्यात आले. यावेळी मतदानासाठी आवश्यक असलेले निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्राचे वितरण डॉ .संदीप शिंदे, डॉ. दिगंबर कदम, श्रीमती शुभांगी जोशी , श्रीमती मनिषा मोहिते इत्यादी कर्मचाऱ्यांनी केले. हे प्रशिक्षण यशस्वीतेसाठी राजकुमार कोटुरवार, राजेश कुलकर्णी, विजयकुमार चोथवे,साधना देशपांडे, निकीता मैड व तहसील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

00000











No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...