वृत्त क्र. 392
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ;
निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये
· लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये 60.94 टक्के मतदान
· तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था ; 24 तास इन कॅमेरा निगराणी
· मतदार, शिक्षक, कर्मचारी, प्रतिनिधींचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आभार
नांदेड दि. 27 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी काल 26 एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर सकाळपर्यंत 16-नांदेड लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रातील मतयंत्र नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात स्ट्रॉगरूममध्ये पोहचले आहेत. निवडणूक निरीक्षक, जिल्हाधिकारी, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम सिलबंद करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणूक यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समस्त मतदार, शिक्षक, कर्मचारी, प्रतिनिधींचे आभार व्यक्त केले आहेत.
विदर्भातील पाच व मराठवाड्यातील तीन अशा आठ ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये काल २६ एप्रिल रोजी मतदान पार पडले. नांदेडमध्ये २३ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाकडून आलेल्या आकडेवारीनुसार नांदेडमधील मतदानाची टक्केवारी 60.94 टक्के आहे. सर्वाधिक मतदान भोकर विधानसभा क्षेत्रात झाले असून सर्वात कमी मतदान मुखेड विधानसभा क्षेत्रात झाले आहे. 4 जून रोजी नांदेडच्या खासदाराची निवड होणार आहे. नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये ही मतमोजणी होणार आहे.
स्ट्राँग रूमला कडक सुरक्षा
शासकीय तंत्रनिकेतन मध्ये ज्या ठिकाणी मतयंत्र ठेवलेली आहेत त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. या ठिकाणी कोणालाही प्रवेश नाही. तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी कार्यरत आहे. यामध्ये बाहेरील सुरक्षा व्यवस्था, स्थानिक पोलीस बघतात. मधल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी आहेत. तर ज्या ठिकाणी मतपेट्या सीलबंद केल्या आहेत. त्या ठिकाणी केंद्रीय राखीव दलाचे सशस्त्र जवान 24 तास कडा पहारा ठेवून आहेत. ही सुरक्षा व्यवस्था 4 जून पर्यंत राहणार आहे. 3 जूनला मतमोजणीचे “मॉक ड्रील” होईल.
आज निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांच्या मुख्य उपस्थितीत स्ट्राँग रूम सील करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यासाठी शासकीय तंत्रनिकेतन परिसरात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, सहा विधानसभाक्षेत्राचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीतील मतदान
काल झालेल्या मतदानानंतर मतदानाची नेमकी टक्केवारी विधानसभाक्षेत्र निहाय पुढीलप्रमाणे आहे.
भोकर विधानसभा क्षेत्र एकूण मतदार २ लक्ष ९४ हजार ४०९ यापैकी १ लक्ष ९२ हजार ४४६ मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदार 1 लक्ष 3 हजार 812, स्त्री मतदार 88 हजार 633 व तृतीयपंथीयांची संख्या 1 आहे. एकूण टक्केवारी ६५.३७ अशी आहे.
नांदेड उत्तर मध्ये एकूण मतदार ३ लक्ष ४६ हजार ८८६ यापैकी २ लक्ष ३ हजार ४२ मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदार 1 लक्ष 8 हजार 591, स्त्री मतदार 94 हजार 440 व तृतीयपंथीयांची संख्या 11 आहे. एकूण टक्केवारी ५८.५३ अशी आहे.
नांदेड दक्षिण मध्ये एकूण मतदार ३ लक्ष ८ हजार ७९० यापैकी १ लक्ष ८६ हजार १५७ मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदार 1 लक्ष 357, स्त्री मतदार 85 हजार 799 व तृतीयपंथीयांची संख्या 1 आहे. एकूण टक्केवारी ६०.२९अशी आहे.
नायगाव मध्ये एकूण मतदार ३ लक्ष १ हजार २९९ यापैकी १ लक्ष ९६ हजार ८१८ मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदार 1 लक्ष 5 हजार 725 स्त्री मतदार 91 हजार 91 व तृतीयपंथीची संख्या 2 आहे. एकूण टक्केवारी ६५.३२ अशी आहे.
देगलूर मध्ये एकूण मतदार ३ लक्ष ३ हजार ९४३ यापैकी १ लक्ष ८१ हजार ८०६ मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदार 97 हजार 403, स्त्री मतदार 84 हजार 398 व तृतीयपंथीयांची संख्या 5 आहे. एकूण टक्केवारी ५९.८२अशी आहे.
मुखेड मध्ये एकूण मतदार २ लक्ष ९६ हजार ५१६ यापैकी १ लक्ष ६८ हजार ३०१ मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदार 90 हजार 600, स्त्री मतदार 77 हजार 701 व तृतीयपंथीयांची संख्या शून्य. एकूण टक्केवारी ५६.७६ अशी आहे.
16-नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार १८ लक्ष ५१ हजार ८४३ यापैकी ११ लक्ष २८ हजार ५७० मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदार 6 लक्ष 6 हजार 488, स्त्री मतदार 5 लक्ष 22 हजार 62 व तृतीयपंथीयांची संख्या 20 आहे. एकूण टक्केवारी 60.94 अशी आहे.
30 व्हीव्हीपॅट बदलले
लोकसभेच्या मतदान प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचे असणारे मतयंत्र अर्थात व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट. जिल्ह्यामध्ये मतदान प्रक्रिया दरम्यान 4 हजार 136 बॅलेट युनिट वापरल्या गेले. त्यापैकी प्रक्रियेदरम्यान 20 बॅलेट युनिट बदलले गेले. 2 हजार 68 कंट्रोल युनिट वापरले गेले. त्यापैकी दहा कंट्रोल युनिट बदलले गेले. तर 2 हजार 68 व्हीव्हीपॅट पैकी 30 व्हीव्हीपॅट प्रक्रिया दरम्यान बदलले गेले. निवडणूक आयोगाने भेल कंपनीच्या 12 अभियंत्यांची जिल्ह्यात नियुक्ती केली होती. ज्या ठिकाणी प्रक्रिया दरम्यान यंत्र बिघडले त्या ठिकाणी ते बदलण्यात आले. मात्र यामुळे मतदान प्रक्रियेवर कोणताही बदल झाल्याची घटना नाही.
दोन गुन्ह्यांची नोंद
जिल्ह्यामध्ये देगलूर विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये एक गुन्हा रामतीर्थ पोलीस स्टेशन अंतर्गत नोंदविण्यात आला आहे. व्हीव्हीपॅट व बॅलेट युनिटची तोडफोड करणाऱ्या या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंट्रोल युनिटला काही डॅमेज झाले नाही. त्यामुळे मतदान प्रक्रियेवर कोणताही फरक पडला नाही. पोलिसांनी गुन्हेगाराला ताब्यात घेतले आहे. दुसरा गुन्हा देखील याच विधानसभा क्षेत्रात झाला आहे. देगलूर येथे विनापरवाना मोबाईलने शूटिंग करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केलेला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. ज्यांना या निवडणुकीत काही कारणास्तव मतदान करता आले नाही त्यांनी तातडीने आपल्या नावाची नोंद करावी. नोंदीची खातरजमा करावी, असे आवाहन केले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वांना सुलभपणे मतदान करता येईल यासाठी नोंदणी प्रक्रियेत लक्षपूर्वक सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय गेल्या 75 दिवसांपासून अखंडपणे काम करणाऱ्या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या विशेषत: शिक्षकांचे त्यांनी विशेष आभार मानले असून प्रशिक्षणापासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सक्रियेतेने सहभागी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. विविध संघटना, संस्था, विद्यार्थी, मान्यवरांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नासाठी विशेष ऋणनिर्देश केले आहे. याशिवाय सर्व बिएलओ, क्षेत्रिय अधिकारी, पोलीस व अन्य सुरक्षा दलाचे अधिकारी-कर्मचारी, वीज मंडळाचे कर्मचारी, प्रसार माध्यमातील सर्व सहकारी तसेच ग्रामपातळीवर काम करणारे ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यासह सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांचेही आभार व्यक्त केले आहे.
0000
No comments:
Post a Comment