Friday, April 26, 2024

 वृत्त क्र. 390

नांदेड लोकसभेसाठी शांततेत अंदाजे 65 टक्‍के मतदान

·         सायंकाळी सहापर्यत मतदारांच्‍या लांबच लांब रांगा

·         दिव्‍यांगजेष्‍ठ मतदारांसह नवमतदारांनी केले उत्‍साहात मतदान

·         लोकप्रतिनिधीसह मान्‍यवरांनी बजावला मतदानाचा हक्‍क

·         सायंकाळी पाचपर्यत 52.47 टक्‍के मतदान

·         सखी व पर्यावरणपूरक मतदान केंद्रांनी वेधले लक्ष

नांदेड दि. 26 –16- नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सहाही विधानसभा मतदार संघात 2 हजार 62 मतदान केंद्रावर मतदान पार पडले. मतदारांनी मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजेपासून लांबच लांब रांगा लावल्‍या होत्‍या. दिव्‍यांगजेष्‍ठ मतदार यासोबत नवमतदार आणि तृतीयपंथीयांनी मतदानासाठी उपस्थिती लावली. निवडणूक विभाग व स्‍वीप उपक्रमा अंतर्गत मतदार संघात मोठया प्रमाणात जनजागृती करण्‍यात आली होती. त्‍यामुळे सन 2019 च्‍या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यावेळीही अंदाजे 65 टक्‍के मतदान होण्‍याची शक्‍यता आहे. यामध्‍ये थोडा फार बदल होवू शकतो. मतदान केंद्र साहित्‍य प्राप्‍त झाल्‍यानंतर अचूक मतदान टक्‍केवारी कळेल.

अठराव्‍या लोकसभेसाठी नांदेड मतदार संघात 23 उमेदवार रिंगणात आहेत. 18 लाख 51 हजार 843 मतदार आहेत. यात 9 लाख 55 हजार 84 पुरुष तर 8 लाख 96 हजार 617 महिला तर 142 तृतीयपंथीयाचा समावेश आहे. आज सकाळी नांदेड जिल्‍ह्यामध्‍ये बरोबर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. काही ठिकाणी सकाळी 6.30 वाजतापासून मतदानासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावर्षी शहरातील वजीराबाद भागातील गुजराथी हायस्‍कूल येथे महिला सखी केंद्रात मतदारांचे गुलाबपुष्‍प देवून स्‍वागत करण्‍यात आले. जिल्‍ह्यात अनेक ठिकाणी हा उपक्रम घेण्‍यात आला. शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात जेष्‍ठ महिलांसह अनेक मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला.  सकाळी नऊ वाजेपर्यत 7.73 टक्‍के मतदान झाले होते. मतदार संघात शहरी भागासह ग्रामीण भागातही सकाळपासून मतदारामध्‍ये उत्‍साह दिसून आला.

सकाळी नांदेड मतदार संघातील लोकप्रतिनिधीनीसह अनेक मान्‍यवरांनी मतदानाचा हक्‍क बजावला. जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सहकुटूंब आयटीआय परिसरातील कामगार कल्‍याण केंद्रावर मतदानाचा हक्‍क बजावला. तसेच नांदेड जिल्‍ह्यातील बाहेरगावी राहणा-या विद्यार्थी व नागरिकांनी जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांच्‍या आवाहनावरुन अनेक विद्यार्थी व नागरिकांनी प्रतिसाद देत नांदेड येथे येवून मतदानाचा हक्‍क बजावला. सकाळी 11 वाजेपर्यत 20.85 टक्‍के मतदान झाले.

आज विवाह मुहुर्तही होताअनेक जोडप्‍यांनी वि‍वाह विधी पूर्ण करण्‍यापूर्वी प्रथम राष्‍ट्रीय कर्तव्‍याला प्राधान्‍य देत मतदान पूर्ण करुन मगच विवाह सोहळयाचा विधी पूर्ण केला. तसेच नांदेड दक्षिण मतदार संघातील जिल्‍हा परिषद हायस्‍कूल विष्‍णुपूरी येथे पर्यावरण पुरक मतदान केंद्रानेही सर्वांचे लक्ष वेधले.  दुपारी 1 वाजेपर्यंत नांदेड लोकसभेसाठी 32.93 तर तीन वाजेपर्यंत 42.42. टक्‍के मतदान झाले. मतदान केंद्रावर दुपारीही मतदारांच्‍या लांबच लांब रांगा होत्‍या. नांदेड उत्‍तर मतदार संघातील सांगवी येथे अनेक तृतीयपंथीयांनी  मतदान केले . सायंकाळी पाच वाजेपर्यत एकूण 52.47 टक्‍के मतदान संपन्‍न झाले आहे. शहरात व ग्रामीण भागात सायंकाळी सहा वाजेपर्यत मतदान केंद्रावर मतदारांच्‍या रांगा मोठया प्रमाणात दिसून आल्‍या. सायंकाळी सहा वाजेपर्यत मतदान कक्षाच्‍या आतमध्‍ये असणा-या सर्वांना उशिरापर्यत मतदानाची संधी देण्‍यात आली.

या निवडणुकीसाठी गेल्‍या 75 दिवसापासून जिल्‍हा प्रशासन कार्यरत होते. 10 हजार कर्मचारी तर 7 हजार पोलीस तसेच राखीव दलाच्‍या कंपन्‍या गेल्‍या काही दिवसांपासून कार्यरत होत्‍या. आज दिवसभर सहा नियंत्रण कक्षाच्‍या माध्‍यमातून जिल्‍हाधिकारी निवडणूक आयोग व सामान्‍य मतदार यांच्‍या संपर्कात होते. वेब कास्टिंग विभागात वरिष्‍ठ अधिकारी निगराणी ठेवून होते. इव्हिएम व अन्‍य कोणतीही अडचण आल्‍यास कालबध्‍द पध्‍दतीने विशिष्‍ट वेळात समस्‍या सोडवली जात होती. यासाठी जिल्‍हाभर विविध पथके कार्यरत होती. जिल्‍हाधिका-यांनी स्‍वतः नियंत्रण कक्षासोबत अनेक ठिकाणी आकस्मिक भेटी दिल्‍या.

गेल्‍या निवडणुकीत सन 2019 ला 85-भोकर मतदार संघामध्‍ये 70.83 टक्‍के86 नांदेड उत्‍तर  मतदार संघात 62.70, 87 नांदेड दक्षिण मतदार संघात 64.20 टक्‍के, 89-नायगाव मतदार संघात 69.78 टक्‍के मतदान, 90- देगलूर मतदार संघात 63.31 तर 91- मुखेड मतदार संघात  60.57 मतदान असे एकूण मतदानाची टक्‍केवारी 65.18 टक्‍के होती. जिल्‍हा प्रशासनाने दिलेल्‍या माहितीनुसार यावर्षीची टक्‍केवारी देखील सरासरी 65 टक्‍क्‍याच्‍या आसपास असेल असा अंदाज आहे. वृत्‍त लिहेपर्यत रात्री उशिरा आकडेवारी येण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे अचूक मतदानाची संख्‍या उशिराने कळेल असे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.  

0000




















No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...