महिलांनी उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठीआत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी ठेवावी
• नमो महारोजगार मेळाव्यात ‘नारीशक्ती’ परिसंवादातील सूर
लातूर, दि. 23 (विमाका) : आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत असल्या तरी बऱ्याच महिलांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात, विशेषत: उद्योग व्यवसायाची आवड असूनही त्यात पुढे जाता येत नाही. तेंव्हा महिलांनी उद्योगात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास आणि योग्य नियोजनासह पाऊल पुढे टाकल्यास त्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात, उद्योगात यशस्वी होऊ शकतात, असा सूर नमो महारोजगार मेळाव्यात आयोजित ‘नारीशक्ती’ परिसंवादात उमटला.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने आयोजित विभागीय नमो महारोजगार मेळावा आज येथील निवासी महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानात आयोजित करण्यात आला होता. यावेळी झालेल्या नारी शक्ती परिसंवादात विविध क्षेत्रात ठसा उमटवलेल्या यशस्वी महिलांनी संवाद साधला.
यावेळी परिसंवाद ऐकण्यासाठी आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, नगरपालिका प्रशासनचे सहआयुक्त रामदास कोकरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या परिसंवादात उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, सामाजिक कार्यकर्त्या प्रेरणा होनराव, लातूर मधील कौशल्य ॲकडमीच्या संचालिका वैशाली देशमुख, नव्व्या फॅशन डिझायनींगच्या वसुधा माने, राजर्षी शाहू कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. रेणूका लोंढे, नांदेड येथील कौशल्य उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार, उद्योजिका साधना देशमुख यांचा सहभाग होता. यावेळी निवेदिका अंजली जोशी यांनी परिसंवादात सहभागी महिलांकडून त्यांच्या यशस्वीतेचे गमक जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ म्हणाल्या की, घरातील सर्वजण शिक्षण क्षेत्रात होते, परंतु त्यांना प्रशासनात काम करण्याची आवड होती. त्यादृष्टीने मेहनत घेतली व यामध्ये वडिलांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे त्या आज या पदावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर संधी ही व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असते. आपल्या गरजेप्रमाणे तिचा शोध घेऊन उपयोग केला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी डॉ. लोढे म्हणाल्या, महिलांनी डिजिटल साक्षर होण्यावर भर दिला. डिजिटल क्षेत्रात वेगवेगळ्या कामाच्या संधी उपलब्ध होत आहेत. जसे बऱ्याच महिला आपल्या उद्योगाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी युट्यूब चॅनल, वेबसाईट यासारख्या माध्यमांचा वापर करतात. ज्यातून त्यांच्या उत्पादनांसाठी व्यापक बाजारपेठ मिळते. त्यातून आर्थिक उत्पन्नात भर पडण्यास मदत होते.
No comments:
Post a Comment