Wednesday, January 24, 2024

 वृत्त क्र. 74

 

युवकांची नावे मतदार यादीत यावीत यासाठी संकल्प करू या

- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

 

· जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार देऊन सन्मान

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- देशाचा आशावाद आणि लोकशाहीचा पुरस्कर्ता म्हणून आपण युवकांकडे पाहतो. लोकशाहीला भक्कम करण्याची प्रक्रिया ही निवडणुकांसाठी होणाऱ्या अधिकाधिक मतदानातून होत जाते. देशातील युवकांची संख्या लक्षात घेता निवडणुकीच्या मतदानात त्यांच्या सहभागाला खूप महत्त्व आहे. युवकांची नावे मतदार यादीत अधिकाधिक प्रमाणात यावीत यासाठी आपण संकल्प करून त्यावर अधिक भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

 

चर्चगेट, मुंबई येथील जयहिंद महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे बोलत होते. या कार्यक्रमास मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उपनगरचे डॉ. राजेंद्र भोसले, जय हिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दाभोळकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक वाडिया, निवडणूक सदिच्छा दूत प्रणित हाटे, चित्रपट समीक्षक डॉ. संतोष पाठारे, लेखिका डॉ. निर्मोही फडके, दिग्दर्शक प्रकाश कुंटे, अभिनेता विकास पाटील उपस्थित होते.

 

मतदारांचे नियोजनबध्द शिक्षण व निवडणुकीतील त्यांचा महत्वपूर्ण ठरणारा सहभाग याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना छत्रपती संभाजीनगर विभागातुन उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार आज बहाल करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या समवेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगिता चव्हाण, लोहा विभागाचे मतदान नोंदणी अधिकारी शरद मंडलिक उपस्थित होते.

 

मतदानाबद्दल ज्यांनी साक्षरता वाढविण्याचे काम केले, मतदार जनजागृतीचे काम केले अशा स्वयंसेवी संस्था, महाविद्यालय, विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचारी यांचा निवडणूक आयोगामार्फत गौरव करण्यात आला. राज्य निवडणूक आयोग, मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जयहिंद महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

00000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...