Monday, January 1, 2024

वृत्त क्रमांक 1

 श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजन

कृषि विभागामार्फत कृषिनिष्ठ पुरस्काराचे होणार वितरण

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- श्रीक्षेत्र माळेगांव यात्रेनिमीत्त जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत माळेगांव येथे भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात फळेभाजीपाला व मसाला पिके प्रदर्शन व भाजीपाला प्रदर्शन स्पर्धाचे आयोजन केले आहे. तसेच 10 जानेवारी 2024 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण कृषि प्रदर्शनाचे उदघाटन व डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहेअसे जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी विजय बेतीवार यांनी कळविले आहे.

 

जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत यात्रेच्या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात जिल्ह्यातील फळे, मसाला पिके व भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील फळे, भाजीपाला व मसाला पिकांचे उत्कृष्ठ नमुने आणून ठेवावेत. प्रदर्शनात ठेवलेल्या फळे, मसाला पिके, भाजीपाल्याच्या नमुन्यास प्रत्येक वाणातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येईल.  विजेत्या शेतकऱ्यांना रोख बक्षिस व प्रमाणपत्रही देण्यात येईल.

 

डॉ. शंकरराव चव्हाण कृषि प्रदर्शनात एकूण 130 स्टॉलचे नियोजन केले आहे. त्यामध्ये बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपनी, रासायनिक खते उत्पादन करणाऱ्या कंपनी, किटकनाशक औषधे उत्पादन करणाऱ्या कंपनी, ट्रॅक्टर उत्पादन करणाऱ्या कंपनी, शेती उपयोगी औजारे उत्पादन करणाऱ्या कंपनी, सेंद्रीय उत्पादने करणारे शेतकरी, महिला बचत गट , आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण, समाज कल्याण, तसेच कृषी विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग महाराष्ट्र शासन, महाबीज, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, खादी ग्रामोद्योग इत्यादी विविध प्रकारचे स्टॉल्स प्रदर्शनात असणार आहेत.

 

जिल्हास्तरीय फळे,भाजीपाला व मसाला पिके स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून त्यात प्रथमद्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना अनुक्रमे 4 हजार रुपये, 3 हजार रुपये व 2 हजार रुपये याप्रमाणे बक्षीस देण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पुरस्कार समारंभासाठी उपस्थित राहावे व पाच दिवस चालणाऱ्या कृषि प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने केले आहे.

0000

 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...