Thursday, December 28, 2023

वृत्त क्र. 903

 त्या अवैध ताडी विक्रेत्याविरुद्ध   

एमपीडीए अंतर्गत कारवाई 

 

·   राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाची पहिलीच यशस्वी कारवाई

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- शहराच्या नल्लागुट्टाचाळ येथील शाम सुरेश येन्नेली या 27 वय वर्षाच्या आरोपीला अवैध ताडी विक्री करतांना वारंवार पकडण्यात आले होते. त्याच्या विरूद्ध राज्य उत्पादन शुल्क, नांदेड ब विभागातर्फे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 93 अंतर्गत उपविभागीय दंडाधिकारी नांदेड यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. उपविभागीय दंडाधिकारी यांनी 25 हजार रक्कमेचे चांगल्या वर्तवणुकीबाबत बंधपत्र घेण्यात आले होते. आरोपीला वारंवार संधी देऊनही त्याने वर्तवणुकीत सुधारणा केली नाही. आरोपी हा पुन्हा अवैध ताडी विक्री करतांना आढळून आल्याने त्याच्याविरूद्ध 11 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. त्याअनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी एमपीडीए अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत  यांनी मंजुरी देऊन कारवाईचा बडगा उगारला. आरोपी शाम येन्नेली याला छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.  

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्याविरूद्ध विशेष मोहिम हाती घेतली आहे. याअंतर्गत एमपीडीए कायद्यानुसार झालेल्या या कारवाईमुळे सर्व गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला आहे.

 

जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्यांविरूद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करून त्यांना एमपीडीए अंतर्गत थेट कारागृहात रवानगी करण्यात येईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे. या कारवाईसाठी निरीक्षक ए. एम. पठान, दुय्यम निरीक्षक दिनेश सुर्यवंशी, ए. जी. शिंदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक बालाजी पवार, मो. रफी, पी. पी. इंगोले, शिवदास नंदगावे यांचा सहभाग होता.

 

अवैध मद्य निर्मिती अथवा विक्री अथवा वाहतुक यासंदर्भात कोणाचीही तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हॅटसॲप क्रमांक 8422001133, तसेच दूरध्वनी क्र. 02462-287616 यावर  संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   92 फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांगांना अर्ज करण्याची संधी  नांदेड, दि. 23 जानेवारी :- हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्...