Thursday, December 28, 2023

वृत्त क्र. 902

 सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी

शुक्रवारी मुखेड व देगलूर येथे मेळावा 


नांदेड (जिमाका) दि. 28 :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी  शुक्रवार 29 डिसेंबर 2023 रोजी  पंचायत समिती सभागृह  मुखेड   पंचायत समिती सभागृह देगलूर येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

या मेळाव्यात कर्ज मंजुरीचे प्रस्ताव, अर्ज अपलोड करणे, मंजुरीच्या प्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे अधिकारी तसेच बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेचा  लाभ घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी अनुषंगिक व आवश्यक त्या कागदपत्रांसह या मेळाव्यास उपस्थित रहावे. तसेच कर्ज प्रस्ताव प्रलंबित असलेल्या अर्जदारांनीही आवश्यक त्या कागदपत्रासह/कारणासह पूर्ततेसाठी उपस्थित रहावेअसे कळविले आहे.

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट-2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2023-24 नांदेड जिल्हयास एकु 900 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातून लाभ देण्याचे महाराष्ट्र शासनाचे लक्षांक आहे. 

मेळाव्यास येताना आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, दोन फोटो, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला, व्यवसायानुंषिक इतर परवाने  ही आवश्यक  कागदपत्रे सोबत आणावीत.  ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असून अधिक माहितीसाठी सदर योजनेचे https://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळ आहे. तालुक्यातील व परिसरातील पात्र-होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...