आठ तालुक्यातील 25 महसूली मंडळात
दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित
नांदेड, (जिमाका) दि. 17:- जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के पेक्षा कमी व एकूण 750 मि.मि.पेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे, अशा 25 महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. दुष्काळसदृश्य परिस्थिती लागू केलेल्या 8 तालुक्यातील 25 महसूली मंडळाना सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.
दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आलेले तालुके व महसुल मंडळामध्ये हदगाव तालुक्यातील निवघा, पिंपरखेड या महसूल मंडळाचा समावेश आहे. नांदेड तालुक्यातील वजीराबाद, तुप्पा, वसरणी, विष्णुपुरी, तरोडा बु, या मंडळाचा तर हिमायतनगर तालुक्यातील सरसम, जवळगाव या महसूल मंडळाचा समावेश आहे. नायगांव तालुक्यातील कुंटूर, नायगाव खै., बरबडा या मंडळाचा तर कंधार तालुक्यातील कंधार, कुरूळा, फुलवळ, पेठवडज, उस्माननगर, बारुळ या महसूल मंडळाचा समावेश आहे. मुखेड तालुक्यातील मुखेड, जांब बु., मुक्रामाबाद तर लोहा तालुक्यातील कापसी (बु.) कलंबर, सोनखेड यांचा तर देगलूर तालुक्यातील हणेगाव या महसूल मंडळाचा समावेश आहे.
दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 25 महसूल मंडळात शासनाने विविध सवलती लागू केल्या आहेत. यामध्ये जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्रचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलतीचा समावेश असणार आहे.
दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या महसूल मंडळातील संबंधित विभागाच्या प्रमुखांनी गावातील खातेदारांना लागू करण्यात आलेल्या सवलती व उपाययोजना देण्याची व्यवस्था करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.
0000
No comments:
Post a Comment