Tuesday, October 31, 2023

 गर्भवती महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा

-         मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

·         गर्भवतींना पाच हजार रुपये, जिल्ह्यात नोंदणी सुरू

नांदेड (जिमाका) दि. 31 :- प्रधानमंत्री मातृवंदना योजनागर्भवती महिलांसाठी उपयुक्त असूनआता त्यांना पाच हजारांचे अनुदान दोन टप्प्यात मिळणार आहे. नवीन संगणक प्रणालीवर या योजनेची नोंदणी सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ गर्भवती महिलांना लवकरच मिळणार आहे. पहिल्यावेळी पाच हजारांचे अनुदान दोन टप्प्यातच मिळणार आहे. तर दुसरी मुलगी झाल्यास सहा हजार रुपये देण्यात येत आहेत. तरी जिल्ह्यातील गर्भवती महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

 

केंद्र शासनाकडून गर्भवती मातांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजनाराबविण्यात येत आहे. गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना कामाची भरपाई मिळावी म्हणून ही योजना राबविली जाते. याचा लाभ दरवर्षी देशातील लाखो महिलांना होतो. नांदेड जिल्ह्यातील गर्भवती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्रयावर्षीच्या २८ मार्चला याबाबतची संगणक प्रणाली बंद झाली होती. त्यामुळे गर्भवती महिलांकडून अर्ज भरून घेण्यात येत होते. आता गेल्या महिन्यापासून नवीन संगणक प्रणाली सुरू झाली आहे. आता गर्भवती महिलांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ लवकरच मिळणार आहे.

दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मिळणार सहा हजार

दुसरे अपत्य हे मुलगी झाल्यास या योजनेंतर्गत सहा हजार रुपये मिळतात.एका टप्प्यातच ही मदत दिली जाते. त्यासाठी बाळाचे 14 आठवड्यांपर्यंतचे लसीकरण आणि जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे.

जिल्ह्यात 1 हजार 284 महिलांची नोंदणी

नवीन संगणक प्रणाली 8 ऑगस्टला सुरू झाली. तेव्हापासून जिल्ह्यातील गर्भवती महिलांनी नोंदणी केलेली संख्या 1 हजार 284 झाली आहे. यामध्ये पहिल्या बाळंतपणाच्या 938  तर दुसऱ्या वेळी मुलगी झालेल्या 346 लाभार्थी महिलांनी नोंदणी केलेली आहे.

दोन टप्प्यात मिळणार पाच हजार

या योजनेंतर्गत पूर्वी तीन टप्प्यात मदत दिली जायची. आता दोन टप्प्यात देण्यात येत आहे. पहिल्यांदा अपत्य झाल्यास पाच हजार रुपये देण्यात येतात. गर्भवती महिलेला सहा महिन्यांच्या आत तीन हजार रुपये दिले जातात. तर बाळाचं 14 आठवड्यापर्यंत लसीकरण झाल्यानंतर दोन हजारांची मदत दुसऱ्यांदा दिली जाते.

लाभार्थीसाठी आवश्यक कागदपत्रे

(पुढीलपैकी एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक)

 

निव्वळ कौटुंबिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असावे, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती महिला, ज्या महिला 40 टक्के किंवा पूर्णतः दिव्यांग आहेत अशा महिला, बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत महिला लाभार्थी, ई श्रम कार्डधारक महिला, किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला, मनरेगा जॉब कार्डधारक महिला, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका /अंगणवाडी मदतनीस /आशा कार्यकर्ती यापैकी एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना गर्भवती महिलासाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या योजनेत ऑनलाईन नोंदणी करावी, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...