Thursday, October 26, 2023

 परदेशातून आयात केलेले फटाके व त्‍यांच्‍या विक्रीस प्रतिबंध  

अन्यथा कायदेशीर कठोर कारवाई

-   जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- राज्य शासनाच्या गृह विभागाच्या परिपत्रकानुसार आगामी दिपावली सणाच्या पार्श्वभुमीवर विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले फटाक्यांची साठवणूक व विक्रीस प्रतिबंध करण्याकरीता फटाके विक्रीला परवानगी देणारे सर्व यंत्रणांना जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी योग्य त्या खबरदारीचे निर्देश दिले आहेत.  

 

विदेशी फटाक्यांची साठवणूक, विक्री व वितरण होणार नाही याकरिता संबंधित यंत्रणांना सतर्क राहतील व नियमित तपासणी करतील. विदेशी फटाक्यांची साठवणूक, विक्री व वितरण होत असल्याच्या बाबी निदर्शनास आल्यास त्याबाबत कायदेशीर कठोर कारवाई करण्याचे जिल्हादंडाधिकारी यांनी निर्देश दिले आहेत. सर्व फटाका आस्थापनांची सर्व समावेशक तपासणी करुन प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये सर्व ई कॉमर्स कंपनी व स्थानिक विक्रेते यांच्या मार्फत विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेल्या फटाक्यांची व स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेल्या फटाक्यांची विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याचे सांगितले आहे.

 

उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर किरकोळ फटाके विक्री करण्याचे परवाने मंजूर करतांना विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले फटाक्यांची साठवणूक व विक्रीस प्रतिबंध करण्याकरीता निर्देश दिले आहेत.  मा. सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका (सिव्हिल) क्रमांक 728/2015 मध्ये दिनांक 23 ऑक्टोबर 2018 व दिनांक 31 ऑक्टोबर 2018 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी या सर्व सूचना सर्व परवानाधारकांच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत.

 

विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जवळ बाळगणे, त्यांचा साठा करणे आणि त्यांची विक्री करणे कायद्यानुसार अवैध आणि दंडनिय आहे. अशा फटाक्यांची जर कोणी साठवणूक अथवा विक्री करत असल्याचे आढळल्यास जनतेने स्वयंप्रेरणेने त्यांच्या क्षेत्रातील नजीकच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करण्याचे आवाहन जिल्हादंडाधिकारी यांनी केले आहे.

 

आगामी दिपावली सणाच्या कालावधीत आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड, सर्व उपविभागीय दंडाधिकारी, सर्व तालुका दंडाधिकारी जि.नांदेड व सर्व मुख्याधिकारी (नगरपालिका/ नगरपंचायत) जि.नांदेड यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात भरारी पथकाची नियुक्ती करण्याचे सांगितले आहे.  सदर भरारी पथक नियमानुसार कारवाई करतील, असेही जिल्हादंडाधिकारी यांनी परिपत्रकान्वये स्पष्ट केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...