Thursday, October 26, 2023

 वृत्त 

 

सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास

महामंडळाच्या योजनांसाठी होणार विशेष कॅम्प

 

लाभार्थ्यांना योजनांची माहिती देण्यासह अर्जांचाही होणार स्वीकार

बँकांच्या प्रतिनिधीसह संबंधित योजनांच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- महाराष्ट्र शासनामार्फत सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना युवकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. मराठा समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी मराठा समाजातील युवकांना योजनांचा अधिकाधिक लाभ घेता यावा यादृष्टीने प्रत्येक जिल्ह्यासाठी कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करून दिली आहे.

 

या रुपरेषेनुसार जिल्हा पातळीवर कॅम्प अर्थात शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. यात सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची सर्व माहिती नागरिकांना देणे, लाभार्थ्याचे अर्ज स्वीकारणे, योजनेबाबत सविस्तर माहिती पोहोचविणे, संवाद साधने यावर भर दिला जाईल.

 

सारथी संस्थेमार्फत घेण्यात येणारे कार्यक्रम

सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी चर्चासत्र आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या चर्चासत्राच्या माध्यमातून लाभधारकांशी संवाद साधण्यासह त्यांच्या मनातील ज्या काही शंका असतील तर त्याचेही निरसन केले जाणार आहे.

 

20 हजार उमेदवारांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीस सन २०२३- २४ या वर्षात मराठा, कुणबी व कुणबी मराठा अशा एकूण 20 हजार उमेदवारांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यासाठी कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रमाची मागणी नोंदणीचा अर्ज विद्यार्थ्यांकडून भरून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज भरून सारथी संस्थेचे माहितीपत्रक वाटप करण्यासोबत एमकेसीएल मार्फत प्रशिक्षण घेत असलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधता येईल.

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास

महामंडळामार्फत घेण्यात येणारे कार्यक्रम

मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुकानिहाय प्रत्येक ग्रामपंचायतींपर्यंत योजनेची माहिती देण्यात येणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करून त्याच ठिकाणी महामंडळाचे नोंदणी करण्यासंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे. महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना त्वरित व्याज परतावा देण्यासंदर्भात कार्यवाही सुरु करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.


कृषि उद्योग व्यवसायासाठी विशेष मेळावे

मेळाव्याच्या ठिकाणी बँकेचे अधिकारी कर्मचारी तसेच काही छोट्या उद्योगाबाबत आणि कृषी अधिकाऱ्यांमार्फत कृषी संबंधी उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती देणारे अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहून याबाबत माहिती देणार आहेत. संस्थांच्या विविध योजनांच्या लाभार्थ्याची निवड, व्यवसायातील प्रगती याबाबतची सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ याबाबत नियमित आढावा घेणार आहे.

 

बँकांच्या प्रतिनिधीसह संबंधित योजनांच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी

सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना पात्र लाभार्थ्यांना तात्काळ योजनांचे लाभ मिळवून देण्याबाबतच्या शिबिराचे आयोजन संबंधित विभाग प्रमुख, बँक अधिकारी, यांच्या समन्वयातून केले जाईल.

 

सारथी तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती सविस्तरपणे सांगून पात्र लाभार्थ्यांपर्यंत या संस्थांच्या योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबत शिबिराचे आयोजन होईल. हे शिबीर यशस्वीरित्या करण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका, सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नियोजन करीत आहेत.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...