Saturday, October 28, 2023

 वृत्त 

लोकसेवेची पवित्र संधी म्हणून मिळालेल्या नोकरीकडे पहा

- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

 

51 हजारांपेक्षा अधिक युवकांना शासकीय सेवेतील नियुक्तीपत्र बहाल

देशभरात 37 ठिकाणी रोजगार मेळावे; यात नांदेडचा समावेश

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- दीड वर्षांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 10 लाख युवकांना नोकऱ्या देण्याची घोषणा केली तेंव्हा यावर काही जणांचा विश्वास बसला नाही. या दीड वर्षांत देशभरात टप्याटप्याने रोजगार मेळावे घेऊन प्रत्येक मेळाव्यात 50 हजारापेक्षा अधिक युवक-युवतींना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर शासकीय नोकरीची संधी त्यांना बहाल करण्यात आली. यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, अभ्यास, मेहनत हे अधिक महत्त्वाचे ठरले. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, ज्या विभागात आहात त्या क्षेत्रात काम करण्याची मिळालेली ही संधी केवळ शासकीय नोकरी पुरतीच मर्यादीत आहे असे समजू नका तर ती एक लोकसेवेची मिळेलेली पवित्र संधी आहे, असे समजून कार्यरत रहा, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.

 

नांदेड येथे दहाव्या रोजगार मेळाव्यानिमित्त आयोजित विशेष समारंभात ते बोलत होते. विभागीय रेल्वे कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापिका निधी सरकार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, देविदास राठोड, दिलीप कंदकुर्ते व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

आजचा हा दहावा रोजगार मेळावा आहे. भारताच्या अमृत महोत्सवी वर्षात शासनाच्या सेवेत मिळालेली ही संधी योगायोग असून युवकांच्या दृष्टीने अमृतकाळ सुरू झाल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. अत्यंत मेहनत व कष्टाच्या बळावर आपण ही संधी मिळविली आहे. या संधीमुळे तुम्ही आता अधिक जबाबदार झाला असून तुमच्या हातून राष्ट्र विकासाचे अधिकाधिक काम व्हावे, अशा शुभेच्छा त्यांनी युवकांना दिल्या. ज्या क्षेत्रात आपल्याला संधी मिळाली आहे तिथे मानवतेसाठी काम करा. तुमचे नवे जीवन सुरू होत असून सेवाचा अर्थ आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही हा असून इतरांसाठी जे काही अधिक चांगले करता येईल त्याच्याशी कटिबद्ध होणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

 

तंत्रकुशलतेसाठी, कौशल्य विकासासाठी आपल्या सरकारने भरीव काम केले आहे. कर्मयोगी पोर्टलचा प्रारंभ केला असून त्यात सुमारे 750 पेक्षा अधिक ईलर्निंग पाठ्यक्रम देण्यात आलेले आहेत. या पाठ्यक्रमाच्या माध्यमातून नवनियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण घेण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. गरिबांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी, मातृवंदन योजना व इतर योजनांमुळे गत 9 वर्षात भारतातील 13.5 कोटीपेक्षा अधिक लोक दारिद्रयरेषेच्या वर आल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन पर्यंत पोहोचणार असून यासाठी प्रत्येक नागरिकांचे योगदान तेवढेच लाखमोलाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भारत आताही एक ताकद झाली आहे.

 

कोरोना काळात संपूर्ण जगापेक्षा वेगळे काम आपण धैर्याने उभे करून दाखविले आहे. 2 हजार करोड लस ही नागरिकांना शासनातर्फे उपलब्ध करून त्याचे ऑनलाईन प्रमाणपत्र वितरीत करून संपूर्ण जगाचे लक्ष भारताने वेधून घेतले. प्रत्येक क्षेत्रात भारत आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली यश संपादन करत असून विकसीत राष्ट्रासाठी प्रत्येक नागरिक हे भारताचे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले.

 

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आजचा दिवस युवकांसाठी महत्त्वाचा असून त्यांच्या आनंदात आपण सहभागी होऊन शुभेच्छा देऊ, असे सांगितले. शासकीय सेवक म्हणून असलेली जबाबदारी मोठी आहे. यातील सत्व जपा असे त्यांनी सांगितले. रेल्वे विभागीय व्यवस्थापक निधी सरकार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून मान्यवरांचे स्वागत केले. आज प्रातिनिधीक स्वरूपात 55 युवकांना नियुक्तीपत्रे बहाल करण्यात आली. यात 17 मुलींचा समावेश आहे.

 

यात केंद्र सरकारच्या विभागांमध्ये तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश सरकार समर्थित उपक्रमांमध्ये भरती केली जात आहे. देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी रेल्वे मंत्रालय, टपाल विभाग, गृह मंत्रालय, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासह विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये सरकारमध्ये नियुक्तीपत्र दिलेले युवक रुजू होतील.

0000














No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...