Tuesday, August 22, 2023

इतर मागासवर्गीय विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

इतर मागासवर्गीय विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 22 :- राज्यातील ओबीसी प्रवर्गातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत कृषी संलग्न, लघु उद्योग, सेवा उद्योग इत्यादी नवीन व्यवसाय किंवा व्यवसाय वाढीसाठी वित्त पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. इतर मागास वर्गीय प्रवर्गातील इच्छुक व गरजू व्यक्तींनी अधिक माहितीसाठी महामंडळाच्या कार्यालयाचा दूरध्वनी 02462-220865 या क्रमांकावर किंवा www.msobcfdc.org.in या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एन.झूंजारे नांदेड यांनी केले आहे. बीज भांडवल कर्ज योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करण्यात येईल. महामंडळाचा सहभाग 20 टक्के, लाभार्थी सहभाग 5 टक्के व बँकेचा सहभाग 75 टक्के राहील. महामंडळाच्या रक्कमेवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याज दर असून परतफेडीचा कालावधी 5 वर्षे आहे. बँकेच्या रक्कमेवर बँक नियमानुसार व्याज दर आकारण्यात येईल. थेट कर्ज योजना थेट कर्ज योजनेतर्गत महामंडळाकडून व्यवसायानुसार महत्तम एक लक्ष रुपयापर्यंत कर्ज देण्यात येते. या योजनेत लाभार्थी सहभाग नाही. अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा. नियमित 2 हजार 85 रुपये 48 समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज द्यावे लागणार नाही परंतु थकीत झालेल्या हप्त्यांवर दसादशे 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल. वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना गरजू व कुशल व्यक्तींना व्यवसायाकरिता बँकेमार्फत वैयक्तिक कर्ज देण्यात येते. व्यवसायानुसार कर्ज रक्कम 1 ते 10 लाख रुपयापर्यंत बँकेमार्फत कर्ज देण्यात येते. कर्ज रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम महत्तम 12 टक्क्यांच्या मर्यादित व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रामाणिकरणानुसार लाभार्थीच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. लाभार्थीने ऑनलाईन वेबपोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करावे. गट कर्ज व्याज परतावा योजना महामंडळाच्या निकषानुसार विहित केलेल्या निकषांनुसार वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत) (LLP, FPO) अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्था बँकेतर्फे स्वयंरोजगार, उद्योग उभारणीसाठी कर्ज दिले जाईल. त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळकडून अदा करण्यात येईल. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना उच्च शिक्षणासाठी राज्य, देशाअंतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी / विद्यार्थींनींना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणे. अभ्यासक्रमासाठी 10 लक्ष रुपये व परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लक्ष रुपये इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे वय 17 ते 30 वर्षे असावे व तो इमाव प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.ही योजना या बँकेमार्फत ऑनलाईन पध्दतीने राबविल्या जात असून महामंडळाच्या www.msobcfdc.org.in या संकेतस्थळावर स्वत: च्या लॉगीन आयडी तयार करुन अर्ज करावा, असे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ नांदेडचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...