जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक संपन्न
नांदेड (जिमाका) दि. 30 :- शेतकऱ्यांनी युरिया खताचा अति वापर टाळून पर्यायी नॅनो युरियाचा वापर पिकाच्या वाढीच्या अवस्थेत करावा. किटकनाशक फवारणी करतांना विषबाधा न होण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरक्षा किटचा वापर करुन फवारणी करावी. कापूस पिकावर गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव न होण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक किड व्यवस्थापन प्रणालीचा वापर करावा. याबाबत कृषि विभागाने शेतकऱ्यामध्ये जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हास्तरीय कृषिनिविष्ठा सनियंत्रण समिती आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उपविभागीय कृषि अधिकारी रणवीर, तालुका कृषि अधिकारी बालाजी मुंडे, कृषि अधिकारी जी.एन. हुंडेकर, जिल्हा व्यवस्थापक एम.आय.डी.सी. फड, जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके, पोलिस निरिक्षक सातपुते, बियाणे व रा.खते कंपनीचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.
या बैठकीत प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सर्व कंपनी प्रतिनिधी प्रयत्न करावे असे सुचित केले. तसेच कृषि विकास अधिकारी विजय राजेश बेतीवार यांनी रासायनिक खत व बियाणे उपलब्धता बाबत माहितीचे सादरीकरण केले. सर्व कंपनी प्रतिनिधी यांना जिल्हयाच्या पुरवठा नियोजनानुसार रासायनिक खताचा पुरवठा करण्याबाबत सूचना दिल्या. सर्व कंपनी प्रतिनिधी यांनी त्यांच्या रा.खत व बियाणे उपलब्धता बाबत माहिती दिली. आभार मोहीम अधिकारी सचिन कपाळे यांनी मानले.
00000