नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून
ग्रामपंचायत समिती सदस्यावर गुन्हा दाखल
नांदेड (जिमाका) दि. 17 :- बिलोली तालुक्यातील संगरोळी ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत सदस्या शेख मेहताबी लालशा (माहेर) शेख मेहताबी मियॉसाब (सासर) व इतर यांचे विरुध्द जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड यांच्या आदेशान्वये पोलीस स्टेशन विमानतळ नांदेड येथे फौजदारी गुन्हा क्रमांक 0057/2023 नोंद झाला आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सतेंद्र आऊलवार यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
शेख मेहताबी लालशा (माहेर) शेख मेहताबी मियॉसाब (सासर) यांनी पिंजारी-177 (इतर मागास वर्ग) या जातीचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे दाखल केले होते. या प्रकरणात समितीने पोलीस दक्षता पथकामार्फत सखोल चौकशी केली असता शेख मेहताबी लालशा (माहेर) यांनी त्यांचे माहेर मौ. आळंदी ता. बिलोली जि. नांदेड येथील नसताना बनावट, खोटे कागदपत्रे, प्रमाणपत्रे सादर करुन तेथील मुळ रहिवासी (माहेर) असल्याचे दर्शविले. दक्षता पथकाच्या चौकशी दरम्यान मौ. आळंदी ता. बिलोली जि. नांदेड येथील ज्येष्ठ नागरीकांनी ग्रामपंचायत सदस्या शेख मेहताबी लालशा (माहेर) ह्या तेथील रहिवासी नसल्याचा जवाब दिला. दक्षता पथक चौकशीनुसार मौजे आळंदी येथील तत्कालीन ग्रामसेवक नागनाथ रामचंद्र चौंडे यांनी शेख मेहताबी लालशा (माहेर) शेख मेहताबी मियॉसाब (सासर) यांना आळंदी गावातील रहिवासी दर्शविण्यासाठी व जात प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी बनावट, खोटे मृत्यू प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, शिधापत्रिका, ओळखपत्र, रहिवास प्रमाणपत्र व जन्म-मृत्यु अनुउपलब्धता प्रमाणपत्र सादर केले असल्यामुळे ग्रामसेवक नागनाथ रामचंद्र चोंडे यांनी त्यांच्या स्वाक्षरीने शेख मेहताबी लालशा (माहेर) यांना खोटे व बनावट प्रमाणपत्र निर्गमित केल्याबाबत समितीच्या दक्षता पथकास लेखी जबाब दिला.
शेख मेहताबी लालशा (माहेर) यांचा मुलगा शेख मुर्तुजा मियॉसाब व ग्रामसेवक नागनाथ रामचंद्र चोंडे यांनी वरील नमुद खोटी व बनावट कागदपत्रे, प्रमाणपत्रे आधारे उपविभागीय अधिकारी बिलोली जि.नांदेड येथून पिंजारी (इ.मा.व.) जात प्रमाणपत्र प्राप्त केले. सदर जात प्रमाणपत्र आधारे त्यांनी सगरोळी ता.बिलोली, जि.नांदेड येथील ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 राखीव जागेवर लढविली. त्या सदस्य पदावर दिनांक 29 जानेवारी 2021 रोजी निवडून आल्या. जात वैधता प्रमाणपत्रासाठी त्यांचा प्रस्ताव समितीस दि. 26 डिसेंबर 2020 दाखल केला होता. समितीच्या निदर्शनास वरील वस्तुस्थिती निदर्शनास आल्याने समितीने त्यांचे पिंजारी जात प्रमाणपत्र दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजीच्या आदेशान्वये अवैध ठरविले आहे. शेख मेहताबी लालशा (माहेर) व त्यांचा मुलगा शेख मुर्तुजा मियॉसाब व ग्रामसेवक नागनाथ रामचंद्र चोंडे व इतर विरुध्द भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यास समितीच्या पोलीस निरीक्षक पक्षता पथकास आदेशीत करण्यात आले. या आदेशान्वये पोलीस निरीक्षक दक्षता पथक यांनी समितीतर्फे फिर्यादी देऊन दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी विमानतळ पोलीस स्टेशन नांदेड येथे गुन्हा नोंदविला. या गुन्हयाचा तपास विमानतळ पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांचे मार्गदर्शनाखाली श्री.जाधव, पोलीस उपनिरीक्षक व इतर हे अधिक तपास करीत आहेत.
000000
No comments:
Post a Comment