Monday, January 23, 2023

वृत्त क्रमांक 36

असंविधानिक मार्ग अवलंबिल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई

-  जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत

 

तक्रारदारांच्या तक्रारीबाबत विभाग प्रमुखांसमवेत

विशेष सुनावणी घेऊन तक्रारींचा निपटारा

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- तक्रारदारांच्या तक्रारींचा निपटारा हा तक्रारदारांच्या समोर झाल्यास त्यांचेही विश्वासार्हता वाढीस लागते. मोर्चा, धरणे, उपोषण, आमरण उपोषण हे प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन यासारख्या राष्ट्रीय सणांच्या अनुषंगाने अपेक्षित नाहीत. एकप्रकारे या राष्ट्रीय सणांचा अवमान केल्याचे हे द्योतक आहे. जिल्ह्यात लागू असलेली आचारसंहिता, जमावबंदी लक्षात घेता तक्रारदारांनी कोणत्याही प्रकारचे असंविधानिक मार्ग अवलंबिल्यास संबंधितांविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

 

तक्रारदाराच्या मागण्यांमधील सत्यता पडताळून त्याचा वेळीच निपटारा करण्याच्यादृष्टीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात तात्काळ तक्रार निवारण सभा आयोजित करण्यात आली होती. यात आज रोजी पर्यंत प्राप्त व विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथील उपोषण संदर्भाने आलेले 5 अर्ज जिल्हाधिकारी स्तरावरील 27 अर्ज, नांदेड जिल्ह्यातील आत्मदहन संदर्भाने आलेले 33 अर्ज व नांदेड शहरातील 7 अंदोलनाच्या अर्जाबाबत सुनावणी घेण्यात आली. यासाठी सर्व विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी कार्यालयाने पाचारण केले होते. प्रत्यक्ष कार्यालय प्रमुख व अर्जदार यांची समोरासमोर सुनावणी झाल्यामुळे जलदगतीने निपटारा होऊ शकला याबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी समाधान व्यक्त केले. काही प्रकरणात जर संबंधित प्राधिकरणाबाबत काही तक्रार असल्यास संबंधीत प्राधिकरणाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे अपील सादर केले जाऊ शकते, असे त्यांनी निर्देशीत केले.

 

जिल्ह्यात सध्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता असून त्याअनुषंगाने फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) (3) जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. याचबरोबर सर्व संबंधित विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, कार्यासन यांनी अर्जदार, तक्रारदार यांच्या समवेत समन्वय साधून प्रकरणे तात्काळ निरसीत करण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.

000000



No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...