Monday, January 16, 2023

वृत्त क्रमांक 28

 राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत

महिला हेल्मेट रॅली संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- राज्य रस्ता सुरक्षा अभियान-2023 हे दिनांक 11 ते 17 जानेवारी 2023 दरम्यान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करावे म्हणून महिला हेल्मेट रॅलीचे आयोजन आज करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपाचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने, पोलीस उपअधीक्षक श्रीमती अश्विनी जगताप, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांची उपस्थिती होती.

 

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने नांदेड जिल्हयात विविध रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महिलांनी दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेट वापर करावा यासाठी महिला हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले. अपघाताची संख्या कमी करण्याबाबत जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यात सर्व नागरिकांनी वाहतूक नियमावलीचे पालन करुन सहकार्यातून अपघात मुक्त नांदेड जिल्हा करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले.

 

ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पोलीस अधीक्षक कार्यालय, कलामंदीर, शिवाजीनगर, राज कॉर्नर, एस.टी.वर्कशॉप, येथून आयटीआय पर्यंत होता. या रॅलीत  सुमारे 150 महिलांनी सहभाग नोंदविला होता. यापैकी सुमारे 60 महिला या पोलीस विभागातील होत्या. रॅलीच्या वेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक, सहा,मोटार वाहन निरिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. रॅलीसाठी मोटार वाहन वितरक, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक यांनी सहकार्य केले.

00000





No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 52 बारावीच्या मुलांसाठी यावर्षी हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध ; शिक्षण मंडळाचा निर्णय माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून हॉल ति...