Tuesday, October 4, 2022

 नरहर कुरुंदकर स्मारक नव्या पिढीशी

अधिक जुळण्यासाठी मिळून प्रयत्न करू

-        जिल्हाधिकारी अभिजित राऊत  

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- नरहर कुरुंदकरांनी लोकशिक्षण आणि विवेकवाद यात जे योगदान दिले आहे त्याला तोड नाही. येणाऱ्या काळातही त्यांची ग्रंथसंपदा ही लोकशिक्षकाच्या भूमिकेतून खूप महत्वाची आहे. एक तटस्थ विश्लेषण कसे असू शकते याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी जागर, शिवरात्र, मागोवा, आकलन सारख्या ग्रंथामधून प्रत्यास दिला आहे. त्यांच्या विचाराला प्रवाहित करण्याच्या उद्देशाने नरहर कुरुंदकर स्मारक आणि संशोधन केंद्र काळाची गरज आहे. या केंद्राला नव्यापिढीशी कसे जोडता येईल, त्यादृष्टिने मला काही योगदान देता येईल का हे तपासण्यासाठी मी येथे आल्याची निर्मळ प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

 

नांदेडच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राची ओळख अवघ्या मराठी विश्वाला करून देणाऱ्या नरहर कुरुंदकर स्मारकास त्यांनी आज स्वत:हून भेट दिली. यावेळी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे, कुरुंदकर संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत, विश्वस्त प्रा. मधुकर राहेगावकर, लक्ष्मण संगेवार, डॉ. श्रीनिवास पांडे, डॉ. अभय दातार, प्रजावाणी संपादक शंतनू डोईफोडे, प्रा. सावणे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

नांदेडला अध्यात्मिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मोठा वारसा आहे. श्री गुरुगोबिंद सिंघजी यांनी ग्रंथाला गुरूच्या स्वरुपात पुढे केले आहे. ग्रंथाला गुरूच्या स्वरुपात पाहणे यापेक्षा मोठी शिकवण असू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

 

नरहर कुरुंदकर यांनीही समाजाला आवश्यक असलेल्या विवेकी विचारांचा धागा ग्रंथातून आज उपलब्ध आहे. अनेक विषयांवर त्यांची विवेचने हे युवापिढी  पर्यंत जाणे आवश्यक आहे. कुरुंदकर स्मारका सारखी केंद्र हे या जिल्ह्याचे शक्तीस्थळ असून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याच्याशी कसे जोडता येईल हा खरा प्रश्न आहे. नरहर कुरुंदकर स्मारक अधिक लोकाभिमूख भूमिका घेऊन जे काही प्रयत्न करेल त्यासोबत मी माझ्यापरीने योगदान देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

यावेळी ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत यांनी स्मारकाच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे स्वागत केले. या स्मारकास स्वत:हून भेट दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. संस्थेचे विश्वस्त लक्ष्मण संगेवार यांनी स्मारकाबाबत माहिती दिली.

000000






No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...