Tuesday, March 8, 2022

 कृषि क्षेत्रात महिलांचा सहभाग महत्वाचा

-         जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर 

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  कृषिक्षेत्रामध्ये महिलांचे वाढते प्रमाण तसेच शेतीकामातील त्यांचा सहभाग हा महत्वाचा आहे. त्यांच्या कष्टाशिवाय शेतीची कामे अपूर्ण आहेत. महिलांनी कोणतीही मनात भिती न बाळगता पुढे येऊन हिरीरीने कामे करावेत. यातूनच महिलांचे अस्तित्व टिकवून ठेवता येते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले. 

जागतिक महिला दिन व भारतीय स्वतंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून कृषि विभागामार्फत विशेष उल्लेखनिय कामगिरी केलेल्या शेतकरी महिला, शेतमजूर, उद्योजक व कृषि विभागातील महिला अधिकारी-कर्मचारी यांचा सत्कार कार्यक्रम हॉटेल तुलसी कंम्फर्ट नांदेड येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी विपीन इटनकर, शास्त्रज्ञ  श्रीमती नादरे  डॉ. देविकांत देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर .बी. चलवदे, प्रगतीशील महिला शेतकरी, शेत मजूर, महिला शेतकरीगटाचे प्रतिनिधी, महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी आदींची उपस्थिती होती. 

जास्तीत जास्त महिलांनी एकत्र येऊन गट व कंपनी स्थापन करून कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. कृषि पुरक उद्योगांत देखील महिलांचा सहभाग जास्तीत जास्त वाढावा याबाबत शासन तत्पर आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.  

सद्यस्थितीत कृषि विभागाने विविध योजनांद्वारे शेतकरी महिलांना लाभ देऊन त्यांना प्रोत्साहित केल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी सांगितले. महिला सशक्तीकरणाबाबत श्रीमती नादरे यांनी मार्गदर्शन केले. महिला गट तयार करुन शासकीय योजनेचा लाभ घेण्याबाबत प्रकल्प उपसंचालक (आत्मा) श्रीमती एम.आर. सोनवणे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित प्रगतीशील महिला व शेतकरी गट प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रगतीशील महिला, शेतकरी, शेत मजूर व कृषि विभागातील कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करुन त्यांचा सन्मान करण्यात आला. सुत्रसंचालन कृषि सहाय्यक शिवकुमारी देशमुख यांनी केले.  

00000



No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...