Monday, March 21, 2022

 

धान्य महोत्सवात शेती पुरक उद्योगातून

महिलाही घेत आहेत भरारी

 

नांदेड, (जिमाका) दि. 21  :- विकेल ते पिकेल अभियानातर्गंत येथील जिल्हाधिकारी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या धान्य महोत्सवात शेतीपुरक उद्योगातून बचतगट आणि स्वव्यवसायातून महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्येक स्टॉलला आज भेट देवून महिलांना प्रोत्साहन दिले.

गोपाल चावडी येथील बालाजी महिला बचत गट व कांताबाई संग्राम इंगळे या महिला शेतकऱ्यांनी जात्यावर तयार केलेली मुगडाळ, उडीद डाळ, हिरवे मुग हे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. दालमिल मधील दाळीची चव व दगडी जात्यावर हाताने भरडलेल्या दाळीची चव यात कमालीचा फरक लक्षात येतो. पुर्णत: नैसर्गिक पध्दतीने केलेली ही डाळ व इतर उत्पादने मागील पाच वर्षापासून विक्री करत आहेत.

 

बोरगाव जि.नांदेड येथील भाग्यश्री महिला बचत गटातील संगीता गंगाराम कंदारे यांनी अगरबत्ती व्यवसाय गेल्या 1 वर्षापासून सुरू केला आहे. या बचतगटामध्ये काम करण्यासाठी महिलांची संख्या मोठी आहे.अगरबत्तीसाठी लागणारा कच्चामाल हे बचत गट  नागपूर येथुन आणतात. सुवासिक लाकूड, मुळ्या, साली, पाने, चंदन, अगरू, कोळसा, लवंग, दालचिनी, निलगिरी, गुलाब, मोगरा, चमेली, रातराणी अर्क, धूप, कापूर, केवडा, कंकोळ, तुळस, अटामसी, मारवा, नागरमोथा, बुक्का, भाताचे तूस, व्हाईट ऑईल, ग्रीस, लुबिकेटिंग ऑईल, सोरा डिंक, गोंद-खळ, स्टार्च बांबू किंवा वेळूच्या कामट्या आदी कच्चा माल आता या महिलांच्या रोजच्या सरावातील झाला आहे.  

 

माधवनगर पूर्णारोड येथील सविता पावडे या मागील पाच वर्षापासून नैसर्गिक शेती करतात. पाच एकर शेतामध्ये विविध प्रकारचे भाजीपाला विक्रीसह चिकू, मोसबी , पेरू या फळाचे उत्पादन त्या घेतात.त्यांनी एक एकरमध्ये काळ्या गव्हाचे पिक घेतले आहे.  कुठल्याही रासायनिक खताचा वापर न करता एक एकर जागेमध्ये त्यांनी काळा गहु पिकविला आहे. काळा गहू मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. या गव्हामध्ये व्हिटॅमिन, खनिज, प्रोटीन व फायबरयुक्त असून शरीरासाठी उत्तम आहे.शरीरात ॲटीऑक्सीडेंटची मात्रा वाढविण्यास प्रभावी आहे.सामान्य गव्हापेक्षा अधिक पोषक तत्वे यामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

00000

 

 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...