Tuesday, March 29, 2022

 तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त

मतदार नोंदणीचे विशेष शिबीर 

नांदेड (जिमाका) दि. 29 :-  आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन म्हणून 31 मार्च हा दिवस जगभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत तृतीय पंथीयाच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. तेंव्हा आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळखदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील तृतीय पंथीयासाठी कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थानी आणि व्यक्तींनी या मोहिमेला सहकार्य करुन अधिकाधिक तृतीय पंथीयांनी या विशेष शिबिरात मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

सर्व पात्र तृतीयपंथीय नागरिकांची मतदार यादीत नोंदणी करणे हे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उद्दिष्ट आहे. मुंबई शहर, उपनगर या जिल्ह्यात 27 मार्च ते 10 एप्रिल 2022 या कालावधीत तर उर्वरित महाराष्ट्रात 27 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत ही नोंदणी शिबिर राबविली जाणार आहेत. तृतीय पंथीयाकडे आवश्यक कागदपत्रे असलेली कमतरता लक्षात घेऊन भारत निवडणूक आयोगाने त्यांना कागदपत्रांबाबत सवलत देवू केली आहे. 18 ते 21 वयोगटातील ज्या तृतीय पंथी व्यक्तीकडे वयाचा कोणताही पुरावा नसेल तर त्यांच्या गुरु मॉ ने दिलेले प्रमाणपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. तसेच 21 वर्षावरील तृतीय पंथीयाने वयाचा पुरावा म्हणून स्वत:चे वय सांगणारे प्रमाणपत्र दिल्यास ग्राह्य धरले जाते. तसेच पत्त्याचा पुरावा म्हणून संबंधित व्यक्तींच्या नावे सध्याच्या निवासस्थानी आलेले टपालसुध्दा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. या कागदपत्रानुसार नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात मोठया प्रमाणात तृतीय पंथीयांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे.

00000



 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...