Tuesday, March 29, 2022

जागरूक लोकसहभाग हाच

ग्रामीण भागाच्या विकासाचा मूलमंत्र  

- पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड, (जिमाका) दि. 29 :- लोकसहभाग हा कोणत्याही गावाच्या विकासाचा आत्मा असतो. या मूलमंत्रावर शेंबोली येथील नागरिकांनी विकास कामांना गुणात्मक दर्जा बहाल केला आहे. शासनाचा विविध योजनांच्या माध्यमातून मिळणारा निधी अधिकाधिक सदउपयोगात, दर्जेदार कामात कसा उपयोगी आणावा याचे उत्तम उदाहरण म्हणून शेंबोलीकडे पाहता येईल, या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शेंबोलीकरांचा गौरव केला. 

मुदखेड तालुक्यातील मुगट, शेंबोली येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमर राजूरकर, गोविंदराव शिंदे नागेलीकर, हरिहरराव भोसीकर, आनंद बोंढारकर, अरुणाताई कल्याणे आदी मान्यवर उपस्थित होते. 

शेंबोली गावातील सिमेंट रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. ग्रामपंचायत असलेल्या गावात एवढ्या गुणात्तमक दर्जाचा चांगला रस्ता होऊ शकतो, यावर विश्वास बसणार नाही. या गावात जवळपास 20 लाख रुपये लोकवर्गणी करुन बौद्ध विहार साकारला जातो, ही बाब सुद्धा तेवढीच भूषणावह असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगून दोन्ही कामांच्या गुत्तेदारांचा गौरव केला. ग्रामीण भागातील जनतेला प्रत्यक्ष भेटून त्यांचे म्हणणे समजून घेणे, त्यांच्या नजरेतील विकासाच्या गरजा समजून घेणे याला मी अधिक प्राधान्य देत आलो आहे. मुदखेड, भोकर व नांदेड जिल्ह्यातील बऱ्याचशा भागात पांदण रस्त्यांचा प्रश्न शेतकऱ्यांच्या चर्चेतूनच समोर आला. या प्रश्नांवर आपण जिल्हा पातळीवर एक स्वतंत्र मोहिम राबवून जिल्हा प्रशानातर्फे गती दिली. अजूनही बऱ्याच भागात शेतीकडे जाणारे लहान पांदण रस्ते होणे आवश्यक असून त्यासाठी ग्रामविकास विभाग व इतर विभागांशी चर्चा करून अधिकचा निधी कसा उपलब्ध होईल याचे नियोजन करत असल्याचे त्यांनी सांगितले.   

नांदेड जिल्ह्यात महामार्गाचे जाळे आपण मोठ्या प्रमाणात निर्माण करीत आहोत. भोकर-मुदखेड मार्गाने दोन्ही तालुके अधिक जवळ आले आहेत. आजवर दूर्लेक्षीत असलेल्या अनेक विकास योजना आपण हाती घेतल्या. जवळपास 20 कोटी 66 लक्ष रुपये एकट्या शेंबोली गावासाठी आपण मंजूर केले. आज एकुण 7 कोटी 41 लाख रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन केले. 13 कोटी 25 लाख रुपयांची कामे पुढच्या टप्प्यात आपण हाती घेणार आहोत. शेंबोली येथे जलव्यवस्थापनाच्यादृष्टिने पुलाच्या ठिकाणीच बंधाऱ्याच्या स्वरुपात काही करता येते का याचेही आम्ही पडताळणी करू पाहू असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ग्रामस्थांशी बोलतांना सांगितले.

ग्रामीण भागासाठी रस्ता, आरोग्य, दिवाबत्ती, पाणी हे कळीचे प्रश्न असतात. ग्रामपंचायतीने त्यांच्या पातळीवर या मूलभूत प्रश्नांसाठी योग्य व्यवस्थापन करणेही आवश्यक राहते. ग्रामीण भागातील या प्रश्नांकडे अधिक लक्ष देऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात ग्रामपातळीपर्यंत भक्कम आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याचे आमदार अमर राजूरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. ज्या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो सोडविण्यासाठी योग्य नियोजन केले आहे. या समवेत पुढील 25 वर्षात गावनिहाय असणारी लोकसंख्या लक्षात घेता किती पाणी लागेल याची ब्ल्यू प्रिंट तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिले असून विकासाची कोणतेही कसर राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 

मुदखेड तालुक्यातील मुगट-रोहिपिंपळगाव रस्त्यावर दोन लहान पुलांचे बांधकाम, शेंबोली-डोंगरगाव-निवघा-खांबाळा-मुगट-धनज या मार्गावर लहान पुलांचे बांधकाम, शेंबोली-चितगिरी रस्त्यावर शेंबोली गावाजवळ मोठ्या पुलाचे पोचमार्गासह बांधकामांचा शुभारंभ आज पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

000000

No comments:

Post a Comment

नांदेड जिल्ह्यात पशुधनाचे शंभर टक्के ईअर टॅगिंगची मोहिम · पशुसंवर्धन विभागाला पशूपालकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन

  नांदेड जिल्ह्यात पशुधनाचे शंभर टक्के ईअर टॅगिंगची मोहिम ·          पशुसंवर्धन विभागाला पशूपालकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन   नांदेड ...