Sunday, December 12, 2021

 ग्रामीण भागातील पहिली ते चौथीच्या व शहरी भागातील

पहिली ते सातवीच्या शाळा आज सुरू होणार 

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी व महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग असलेल्या सर्व शाळा सोमवार 13 डिसेंबर 2021 पासून सुरू होणार आहेत. सर्व पर्यवेक्षकीय अधिकारी आणि शाळा पातळीवरील मुख्याध्यापकांनी शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी आणि महापालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यात आलेले नव्हते. शासन परिपत्रक 29 नोव्हेंबर 2021 नुसार या शाळा 1 डिसेंबर 2021 पासून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतू नांदेड जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाची स्थिती पाहता या शाळा 13 डिसेंबर 2021 पासून सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सूचित केले होते. त्यामुळे आता या शाळा 13 डिसेंबर 2021 पासून सुरू करण्यात येत आहेत. 

सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेणे, विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात न येण्याबाबत आवाहन करणे, कोविड-19 संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आणि जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रात, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर, एका वर्गात जास्तीतजास्त 15 ते 20 विद्यार्थी बसतील, अशा पद्धतीचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण आढळल्यास नजीकच्या आरोग्य केंद्राला संपर्क करणे,  विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळला तर शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करणे आदी कार्यवाही मुख्याध्यापकांनी करावयाची आहे. 

गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांची तयारी करून सर्व मुख्याध्यापकांना अवगत करावयाचे आहे. दि. 29 नोव्हेंबरच्या शासन परिपत्रकाचे वाचन करून त्यानुसार सर्व शाळास्तरावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी दिले आहेत.

000000

 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...