Sunday, December 12, 2021

 राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 3 हजार 757 प्रकरणे सामोपचाराने निकाली 

·        विविध प्रकरणात 11 कोटी 32 लाख 13 हजार 446 रक्कमेची तडजोड 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- विविध कारणांमुळे अनेकांचे साधे वाद न्यायालयात पोहोचतात. न्यायालयीन प्रकरणातील आपआपसातील वाद, तंटे सामोपचाराने मिटावेत या उद्देशाने जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न झाली. काल 11 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालयात तब्बल 3 हजार 757 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली. याचबरोबर तीन दिवस घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत 2 हजार 868 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातील आर्थिक व्यवहाराशी निगडीत असलेल्या विविध प्रकरणात 11 कोटी 32 लाख 13 हजार 446 एवढ्या रक्कमेची तडजोड झाली असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आर. एस. रोटे यांनी दिली. 

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत ल. आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 11 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. तडजोड झालेल्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये दिवाणी, फौजदारी, एन.आय.अॅक्ट., बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे प्रकरणे इतर, तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालयाच्या प्रकरणांचा, विविध बॅंका तसेच विद्युत प्रकरणे, टेलिफोन, मोबाईल यांचे दाखलपूर्व प्रकरणांचा यात समावेश होता. 

ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायाधीश, पॅनलवरील न्यायाधीश, वकिल, पॅनल सदस्य व सर्व विधिज्ञ यांनी जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक तालुक्यासह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय येथे त्या-त्या न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष, जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्हयातील सर्व विधिज्ञ आणि विविध विमा कंपनी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभाग अधिकारी तसेच जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

लोकअदालत यशस्वी व जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष श्रीकांत आणेकर तसेच जिल्हा न्यायाधीश के. एन. गौतम व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. एस. रोटे यांनी विशेष प्रयत्न केले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी लोकअदालत यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आर. एस. रोटे यांनी उपस्थित सर्व पक्षकार तसेच सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, सर्व न्यायालयीन कर्मचारी, लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानून यापुढे अशीच सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

00000



No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...