Sunday, October 17, 2021

 ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) निमित्त मार्गदर्शक सूचना 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) जुलूस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी 19 किंवा 20 ऑक्टोंबर रोजी (चंद्रदर्शनावर अवलंबून) ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) साजरी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे दिल्या आहेत. 

कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता राज्य महसूल व वन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन विभागाचे परिपत्रक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आदेश तसेच ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक  सूचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ईद-द-मिलाद (मिलादुन नबी) शक्यतोवर घरात राहूनच साजरी करावी.  मिरवणुका काढावयाच्या झाल्यास पोलीस प्रशासनाच्या पूर्व परवानगीने एका मिरवणुकीत जास्तीतजास्त 5 ट्रक आणि एका ट्रकवर जास्तीत जास्त 5 व्यक्तींना परवानगी राहील. मिरवणूक दरम्यान मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. 

मिरवणुकीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीने ध्वनी प्रक्षेपणाची व्यवस्था केल्यास ध्वनीप्रदुषण नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मिरवणुकीच्या दरम्यान मिरवणुकीच्या स्वागतासाठी पंडाल बांधावयाचे असल्यास शासनाच्या नियमानुसार संबंधित महापालिका, पोलीस व स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. या पंडालमध्ये एकावेळी किती उपस्थिती असावी याबाबत स्थानिक प्रशासनाचे ठरविलेल्या विहित नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 24 सप्टेंबर रोजीच्या शासन आदेशातील नियमांचे काटेकोर पालन करुन मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर राखून धार्मिक प्रवचन करण्यास परवानगी देण्यात येत आहे. प्रवचनाचे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन शक्यतो ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत. केबल टिव्ही, फेसबुक इत्यादी माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे इतरांना पाहण्याची व्यवस्था करावी. 

सबील / पाणपोई ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) निमित्त मिरवणुकीच्या रस्त्यावर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या स्मरणार्थ पाण्याचे तात्पुरते सबील (पाणपोई) लावण्यात येतात. सबीन (पाणपोई) बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्याठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहून नये. या ठिकाणी सीलबंद पाण्याच्या बाटलींचे वाटप करण्यात यावे. सबील (पाणपोई)च्या ठिकाणी स्वच्छता राखावी. सोशन डिस्टन्सिंगचे पालन करावे. 

प्रतिबंधीत क्षेत्रात सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यात कोणतीही शिथीलता देण्यात येणार नाही. कोविड-19 परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे असे उपक्रम राबविण्यात यावेत. या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी. या सूचनेव्यतीरिक्त स्थानिक परिस्थिती पाहून निर्बंध अधिक कडक करण्याचे अधिकारी संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासनाला असतील. 

कोविड-19 या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पूनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. शासन परिपत्रकानंतर व मिरवणूक सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे आश्यक राहील, असेही गृह विभागाने शासन परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...