Friday, August 13, 2021

 

राज्यस्तरीय सोयाबीन परिषदेचे सोमवारी लातूर येथे आयोजन   

नांदेड (जिमाका) दि. 13 :- राज्यात खरीप हंगामात सोयाबीन हे प्रमुख पिक असून सर्वात जास्त शेतकरी सोयाबीनचे पिक घेतात.  राज्यात सर्वसाधारणपणे 44 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी केली जात असून प्रामुख्याने विदर्भ व मराठवाडा विभागाचे यात प्राबल्य आहे. सोयाबीन पिकांचे उत्पन्न व उत्पादकता वाढविण्याबरोबरच मूल्य साखळी विकासासाठी व्यापक प्रयत्न व चर्चा होण्याच्यादृष्टीने कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या उपस्थितीत कृषि विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषि महाविद्यालय लातूर येथे सोमवार 16 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9.30 वा. राज्यस्तरीय सोयाबीन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

या परिषेदमध्ये सोयाबीन पिकासाठी विकसीत अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान, सोयाबीन पिकाशी निगडीत यांत्रिकीकर, सोयाबीन प्रक्रियामधील संधी व आव्हाने, विपणन व वायदे बाजार आदी बाबीवर अधिक उत्पादन घेणारे शेतकरी, उद्योजक, सोयाबीन व्यवसायातील तज्ज्ञ, कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, शेतकरी उत्पादक कंपन्या प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

 

या परिषेदेचे उद्घाटन राज्याचे कृषि मंत्री दादाजी भुसे हे करणार असून  वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली परिषद संपन्न होणार आहे.  ही परिषद कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, राज्यमंत्री संजय बनसोडे, कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु अशोक ढवण, कृषि आयुक्त धीरजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

 

सोयाबीन परिषदेमध्ये तज्ज्ञ मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी, शास्त्रज्ञ, वायदेबाजार विश्लेषक  व उद्योजक यांच्यामध्ये विविध विषयावर थेट परिसंवाद होणार असून या परिषदेमुळे सोयाबीन पिकाबाबत  महाराष्ट्र शासनाचे भविष्यातील धोरण ठरविणे सुकर होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाचे यूट्यूब चैनल www.youtube.com/C/ AgricultureDepartmentGoM वरून होणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...