Tuesday, August 3, 2021

 दिव्यांगाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेतर्फे विविध योजनांची प्रभावी अंमलबजावनी करु -जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर

नांदेड (जिमाका) दि. 3 :- मानवी जीवनात प्रत्येकाला विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. दिव्यांगाना जीवनात येणारी आव्हाने ही जास्त काळजीची असतात. जिल्ह्यातील दिव्यांगाना विविध आव्हानावर मात करता यावी यासाठी विविध विकास योजना प्राधान्याने पोहचविण्यासाठी जिल्हा परिषद व प्रशासनामार्फत घेतलेली ही विशेष मोहिम अधिक महत्वाची आहे. ती प्रभावीपणे राबवून दिव्यांगाना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नांदेड जिल्हा परिषद व आम्ही कटिबध्द असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दिव्यांग सहाय्यता कक्षाचे लवकरच निर्माण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित दिव्यांग व्यक्ती हक्क संरक्षण कायदा विषयावर एक दिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकुर-घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजारा, प्रशिक्षणार्थी आयएएस कार्तीकेएन यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्यावतीने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम-2016 मधील तरतुदी व दिव्यांगाच्या विविध योजनांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना व्हावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

दिव्यांगाच्या जीवनात विविध शासकीय योजनांचा लाभ देूवन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. जिल्ह्यातील सर्व दिव्यांगापर्यत शासनाच्या योजना पोहचण्यासाठी त्यांची नोंदणी करुन एकही दिव्यांग व्यक्ती वंचित राहणार नाही यांची काळजी सबंधित यंत्रणानी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
प्रत्येक दिव्यांगामध्ये एक ईश्वरी देणगी असते. कोणतीही कमतरता असल्याची भावना कोणताही दिव्यांग बाळगत नाही. त्यांच्या या आत्मविश्वासाला उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची जोड देवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेने हाती घेतलेला हा अभिनव उपक्रम असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. शासनाच्या योजनांची अंमलबजावनी प्रत्येक अधिकाऱ्यांना करणे क्रमप्राप्त असते. परंतु सामाजिक न्यायाच्या योजनाची प्रतिपुर्ती करताना त्यात आत्मिक समाधानही लाभते असे सांगून त्यांनी अधिकाऱ्यांच्या दृष्टीकोनाला सामाजिक बांधिलकीची भावनिक जोड दिली.

या कार्यशाळेत दिव्यांगासाठी असलेले विविध कायदे व कायद्यातील तरतुदीबाबत मार्गदर्शन अंपग विकास महामंडळाचे माजी महाव्यवस्थापक नंदकुमार फुले यांनी केले. तर दिव्यांगासाठी असलेल्या विविध योजनाची माहिती जिल्हा अंपग व विकास केंद्राचे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर यांनी दिली.

या कार्यशाळेस दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, दिव्यांग संघटनांच्या प्रतिनिधी दिव्यांग शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेचे सुत्रसंचलन लोककवी बापु दासरी यांनी केले.
0000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...