Tuesday, July 20, 2021

अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा

26 जुलैपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल मुल्यमापन कार्यपध्दतीनुसार 16 जुलै रोजी जाहीर झाला आहे. इयत्ता 11 वी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यात एक सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या इयत्ता 10 वी परीक्षेमध्ये उत्तीर्ण, प्रविष्ठ झालेल्या इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या http://cet.mh-ssc.ac.in  या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची सुविधा 26 जुलैपर्यत उपलब्ध करुन दिली आहे. विद्यार्थी, पालक व संबंधित घटकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. 

या परीक्षेचे आयोजन शिक्षण मंडळामार्फत केले जाणार असून त्याअनुषंगाने सन 2021-22 च्या इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन शनिवार 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत करण्यात येणार आहे. ही परीक्षा राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2021-22 मधील इयत्ता 11 वी प्रवेशासाठी असून ती विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक स्वरुपाची आहे. ही परीक्षा ऑफलाईन स्वरुपाची असून ती राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची व ओएमआर आधारीत असेल. अर्ज भरण्यासंदर्भात तसेच सामाईक प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसाठी तपशीलवार सूचना शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, असेही आवाहन शिक्षण मंडळाने प्रसिध्दपत्रकाद्वारे केले आहे.

00000


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...