Tuesday, June 1, 2021

 

मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण

कार्यक्रमात सहभाग नोंदविण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रात साथीच्या रोगाशी संबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे तसेच या क्षेत्रातील संसाधनामधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा यासाठी जिल्ह्यात सन 2021 साठी मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या जिल्ह्यातील युवक-युवतीने जिल्ह्यातील रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करुन प्रामुख्याने ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील सर्व शासकिय रुग्णालय, वैद्यकीय संस्था तसेच 20 पेक्षा जास्त बेडची सोय असणारी रुग्णालये या कार्यक्रमांतर्गत व्यवसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून सुचिबद्ध होऊन त्याद्वारे प्रशिक्षण देण्यास पात्र होऊ शकणार आहेत. हे संपूर्ण प्रशिक्षण उमेदवारांना / लाभार्थ्यांना पुर्णपणे नि:शुल्क असून सुचिबद्ध प्रशिक्षण संस्थांना प्रशिक्षणाचे शुल्क महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत अदा करण्यात येईल. 

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शासकीय रुग्णालय, वैद्यकीय संस्था तसेच 20 पेक्षा अधिक बेडची सोय असणाऱ्या रुग्णालयांनी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 02462-251674 किंवा जिल्हा कौशल्य विकास समन्वयक इरफान खान 7030555244 यांचेशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...