तांत्रिकदृष्ट्या सक्षम व अत्याधुनिक होणार
नांदेडचे
प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र
अशोक चव्हाण यांचे प्रयत्न सार्थकी, विजय
वडेट्टीवारांची तत्वतः मंजुरी
नांदेड (जिमाका) दि. 4 :- नांदेड
येथील प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र तांत्रिकदृष्ट्या सक्षम व अत्याधुनिक
करण्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे प्रयत्न सार्थकी लागले असून, मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या
मागणीला तत्वतः मंजुरी दिली आहे.
मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असिम
गुप्ता, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. बिपीन ईटकर आदी प्रमुख
अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय
घेण्यात आला. नांदेड, परभणी व हिंगोली या तीन
जिल्ह्यांसाठीचे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र नांदेड येथे आहे. हे केंद्र
तांत्रिकदृष्ट्या सक्षम व अत्याधुनिक करण्याच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम
मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण प्रयत्नशील आहेत. या केंद्रासाठी पुरेशा
पायाभूत सुविधा असलेली इमारत उभारण्यासाठी त्यांनी नांदेड जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या परिसरात भूखंड देण्यासाठीही पुढाकार घेतला. तसेच हे केंद्र अत्याधुनिक
तंत्रज्ञान व उपकरणांनी सुसज्ज असण्याची आवश्यकताही त्यांनी विषद केली.
या मागणीचे महत्त्व व गरज लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन विभागाचे
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रासाठी नवीन इमारत
उभारण्यासाठी तात्काळ तत्वतः मंजुरी दिली. नांदेड येथील प्रादेशिक आपत्ती
व्यवस्थापन केंद्राच्या नवीन इमारतीच्या उभारणीसाठी सुमारे ७ कोटी रूपयांचा खर्च
अपेक्षित असून, अत्याधुनिक उपकरणांसाठी सुमारे १९ कोटी
रूपयांचा खर्च अंदाजित आहे. याचा फायदा नांदेड, परभणी व
हिंगोली या तीन जिल्ह्यांना होणार असून, आपत्ती निवारणासाठी
हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उभय
मंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
0000
No comments:
Post a Comment