Tuesday, May 4, 2021

वैद्यकीय उपकरणांच्या निगा व सुस्थितीसाठी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण अत्यावश्यक - पालकमंत्री अशोक चव्हाण

                                                   वैद्यकीय उपकरणांच्या निगा व सुस्थितीसाठी

संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण अत्यावश्यक

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड (जिमाका) दि. 4 :- कोरोनाच्या प्रादुर्भावात अडकलेल्या नागरिकांना तात्काळ उपचार व्हावेत, वेळप्रसंगी जी कांही उपचारासाठी अत्याधुनिक यंत्रणा, उपकरणे लागतील त्यांची गरज ओळखून आपण विविध यंत्रसामुग्री खरेदी केली आहे. यात ऑक्सिजन प्रकल्पापासून ते व्हेन्टिलेटर, सिटीस्कॅन, एमआरआय सारख्या उपकरणांचा समावेश आहे. ही सर्व उपकरणे सुस्थितीत राहीली तरच त्याचा सामान्य नागरिकांना लाभ होईल असे स्पष्ट करुन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी वेळप्रसंगी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देवून त्यांना सक्षम करण्याचे निर्देश दिले.

 जिल्ह्यातील कोराना स्थितीची आढावा बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकरआमदार अमर राजूरकरआमदार राजेश पवार, आमदार श्यामसुंदर शिंदेआमदार मोहन हबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरजिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळेजिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, अपर जिल्हाधिकारी खुशालसिह परदेशीजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकरजिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदेअधिष्ठाता दिलीप म्हेसेंकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णीजिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे आदि मान्यवर उपस्थित होते.

कोरोनाचे आव्हान अजूनही संपलेले नाही. जिल्ह्याच्या आरोग्य सेवेसाठी आपण प्रयत्नांची शर्त करुन मोठ्या प्रमाणात विविध महत्वाची यंत्रसामुग्री घेतली आहे. यासाठी आवश्यक असणारे कर्मचारी व डॉक्टर्स उपस्थित असणे तेवढेच आवश्यक आहे. डॉक्टर आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर वाढलेला ताण समजून घेवून त्यावर मार्ग काढला पाहिजे. सप्टेबर-ऑक्टोबर किंवा त्याही अगोदर कोरोनाची तिसरी लाट येणे अपेक्षित धरुन त्यासाठी आतापासूनच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने सज्ज झाले पाहिजे, असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

रेमडेसिव्हिरची कमतरता आहे हे सत्य नाकारता येणार नाही. जो काही साठा सद्या मिळत आहे. तो खऱ्या गरजूवंताना मिळले याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय येथे नर्सिंग कॉलेजलाही मान्यता मिळवून दिलेली आहे. याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या इमारतीत अधिकाधिक चांगल्या सुविधा आता आणखी देत आहोत. हे नर्सिंग कॉलेज तात्काळ सुरु करण्याबाबत अधिष्ठाता यांनी खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार यांनी आरोग्य सुविधेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले होते.

0000

 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...