Thursday, May 13, 2021

 

कोरोना पार्श्वभूमीवर अनाथ झालेल्या बालकांच्या

काळजी व संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स

अनाथ बालकांसाठी 1098 हेल्पलाइन नंबर 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- कोविड संसर्गामुळे ज्या बालकांनी आपले पालक गमावले आहेत त्यांना संरक्षण मिळावे तसेच ही बालके शोषणास बळी पडू नयेत अथवा अशी मुले तस्करी सारख्या गुन्ह्यामध्ये ओढली जाऊ नयेत याची दक्षता शासनातर्फे घेतली जात आहे. याअनुषंगाने सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या दि. 7 मे 2021 रोजी निर्गमीत केलेल्या शासन निर्णयान्वये नांदेड जिल्ह्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज या टास्क फोर्सबाबत बैठक संपन्न होऊन विचाराविमर्ष करण्यात आला. 

या बैठकीस जिल्हा पोलीस अधिकारी प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. शिवशक्ती पवार, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा बालकल्याण समिती, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रतिनिधी तथा या समितीचे सदस्य उपस्थित होते.   

नांदेड जिल्ह्यात कोविड-19 मुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे नेमकी अनाथ झालेली मुले आहेत का याची वस्तुस्थिती व सत्यता पडताळून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. ही वस्तुस्थिती नांदेड महानगरपालिका क्षेत्रासाठी मनपाचे आरोग्य अधिकारी व मनपा उपायुक्त, ग्रामीण भागासाठी तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी व तहसिलदार हे अनाथ बालके असल्यास त्यांची सत्यता पडताळून टास्क फोर्सला माहिती सादर करतील. शुन्य ते 6 वयोगटातील मुलांसाठी लोहा येथील शिशुगृह, वय वर्षे 6 ते 18 गटातील मुलींसाठी सुमन बालगृह नांदेड आणि लहुजी साळवे बालगृह वाडीपाटी येथे मुलांची व्यवस्था करण्यात आली आहे. चाईल्ड हेल्पलाइनसाठी अर्थात बालकांच्या मदतीसाठी 1098, सेव द चिल्ड्रेन्स 7400015518, 8308992222, अध्यक्ष बालकल्याण समिती 9890103972 आणि बालसंरक्षण अधिकारी- 9730336418 या नंबरवर संपर्क साधावा.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...