Tuesday, March 23, 2021

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेच्या

फिरत्या वाहनाद्वारे प्रसिद्धी उपक्रमाचे उद्घाटन

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते दोन वाहनांना हिरवी झेंडी

नांदेड (जिमाका) दि. 23 :- विशेष घटक योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागात व्हावी या उद्देशाने फिरत्या वाहनाद्वारे प्रचार-प्रसिद्धीच्या उपक्रमाचे आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, माहिती सहायक अलका पाटील आदी उपस्थित होते. कोरोनाच्या त्रीसूत्रीसह हे वाहन ग्रामीण भागामध्ये जनजागृतीचे काम करेल. सामाजिक न्यायाच्या विविध योजनांची माहिती असलेले हे दोन वाहने जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून जनजागृती करतील. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून ही वाहने बुधवार 24 मार्च रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी मार्गस्थ होणार आहेत. 

कोरोनाचा वाढत जाणारा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी ग्रामीण भागात त्रीसूत्रीच्या जनजागृतीसह सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती या फिरत्या वाहनाद्वारे जिल्ह्यातील गावात पोहचविण्याचा प्रयत्न आहे. वाहनांवरील श्राव्य (ऑडियो) ध्वनीफितीद्वारे योजनांची माहिती असणाऱ्या जींगल्स ऐकविण्यात येणार आहेत. गावा-गावात पोहचून विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचीत जातींसाठीच्या विद्यार्थी, तरूण तसेच महिला, शेतकरी आदी घटकांसाठीच्या शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, विविध प्रकारची प्रशिक्षणे, महिला सक्षमीकरण, लाभार्थी व समूह योजनांची माहिती पोहचविण्याचा उद्देश आहे. या वाहनांना जिल्ह्यातील आठ-आठ तालुक्यांची विभागणी करून देण्यात आली असून त्यासाठीचा मार्गही निश्चित करण्यात आला आहे.  





000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...