Monday, March 8, 2021

जिल्हाधिकारी कार्यालयात महिला दिन साजरा

कोरोनाच्या आव्हानात्मक काळात

1 हजार 54 मोतीबिंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केला महिलांच्या कार्याचा गौरव  

नांदेड (जिमाका), दि. 8 :- आजच्या काळातील कोणतेही असे क्षेत्र सुटले नसून सर्वच क्षेत्रात महिलांनी आपला अपूर्व ठसा उमटवला आहे. कोरोना सारख्या आव्हानात्मक काळात महिलांनी आपले कसब व योगदान पणाला लावून जे आव्हान पेलून दाखविले त्याला तोड नाही या शब्दात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या शुभसंदेशात महिलांच्या योगदानाचा गौरव केला. आज जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रम व वैद्यकिय क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिला कोरोना वॉरीयर्स यांचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रातपवार व जिल्हाधिकारी कार्यालय, आरोग्य विभागातील सर्व महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या. 

कोरोनासमवेत इतर वैद्यकिय सेवा-सुविधा सामान्य जनतेसाठी तत्पर ठेवणे हे शासनाचे कर्तव्यच आहे. नांदेड जिल्ह्यातील लोकसंख्या लक्षात घेत ग्रामीण भागात सेवा-सुविधा पोहचविण्यासमवेत आरोग्य विभागाने तब्बल 1 हजार 58 कॅट्रॅक्स आणि मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करून यासाठी योगदान देणाऱ्या डॉ. रोशन आरा तडवी यांच्यासह इतर महिला अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गौरव केला. कोरोनाच्या काळात नेत्रशल्यचिकित्सा विभाग सांभाळणाऱ्या डॉ. कल्पना वाकोडे, डॉ. सुजाता राठोड, डॉ. खान साबा अशरफ, डॉ. अर्चना बजाज, प्रयोगशाळा तज्ज्ञ ज्योती बागल, परिचारिका मालती वाघमारे, जयश्री वाघ, अहवाल नोंदणी विभागातील शुभधा गोसावी, अर्पणा जाधव, रुग्ण व्यवस्थापक डॉ. मसरत सिद्दीकी, स्वच्छता विभागातील किरण हटकर, कोमल दुलगच, समुपदेशक ज्योती पिंपळे, संतोषी रतनसिंघ मंगोत्रा, विशाखा आर. बापटे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी हॅपी क्लबचे कार्यकर्ते मोहमंद शोएब यांच्या आई शबाना बेगम यांचाही प्रातिनिधक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मिना सोलापूरे यांनी केले. यावेळी महिलांच्या आरोग्य तपासणीचे शिबिर जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित केले होते. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी दिपाली मोतियळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, शरद मंडलिक, अनुराधा ढालकरी, संतोषी देवकुळे व सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

0000









No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...