Wednesday, February 10, 2021

 नांदेडमध्ये उभारणार कौशल्य विकासाधारित सेंटर ऑफ एक्सलन्स 

   पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मागणीवर कौशल्य विकासमंत्र्यांनी दिली तत्वतः मान्यता 

नांदेड, (जिमाका) दि. 10:-  नांदेडमधील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रशिक्षण मिळावे, यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मागणीस कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी तत्वतः मान्यता दिली. या केंद्रासाठी जागा व इतर बाबीसंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश श्री. मलिक यांनी यावेळी दिले.  

नांदेडमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करणे, आर्थिक मागास विद्यार्थी व अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारणे यासंदर्भात नांदेडचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या सचिव अंन्शु सिन्हा, कौशल्य विकास आयुक्त दीपक कुशवाह आदी यावेळी उपस्थित होते.  

श्री. मलिक म्हणाले की, कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी तसेच कौशल्याधारित व्यवसायासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती करण्यात येणार आहे. नांदेडमध्ये हे केंद्र सुरू झाल्यामुळे तेथील युवकांना चांगले प्रशिक्षण मिळणार आहे. या केंद्रासाठी 20 एकर जागेची आवश्यकता आहे. यासाठी तसेच सेंटर उभारण्यासाठी आवश्यक बाबीचा प्रस्ताव सादर करावा. 

वसतीगृहासाठी जागेचा प्रस्ताव पाठवावा

आर्थिक मागास घटकातील विद्यार्थी तसेच अल्पसख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण संस्था व पॉलिटेक्निक कॉलेजमागील जागा द्यावी, अशी मागणी श्री. चव्हाण यांनी यावेळी केली. वसतीगृह उभारण्यास मान्यता देऊन यासंदर्भातील प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश कौशल्य विकास मंत्री श्री. मलिक यावेळी दिले.  

जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण संस्था व पॉलिटेक्निक कॉलेज यांच्या मध्ये दोन्ही विभागाची जागा उपलब्ध आहे. या जागेवर सुमारे दोनशे विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारण्याचे नियोजन आहे. ही जागा देण्यासाठी कौशल्य विकास विभागाची मंजुरी मिळावी, अशी मागणी श्री. चव्हाण यांनी केली. तसेच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतून मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात वसतीगृह उभारण्यासंदर्भातही प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश श्री. मलिक यांनी यावेळी दिले. 

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...