Wednesday, February 10, 2021

महारेशीम अभियानाचे जिल्हाधिकारी

डॉ. विपीन इटनकर यांचे हस्ते उद्घाटन

नांदेड, (जिमाका) दि. 10:- पारंपारिक शेतीतून बदलत्या नैसर्गिक हवामानामुळे निश्चित उत्पन्न येईलच याची शाश्वती राहीली नाही. याला शेती आधारित उद्योगाची जोड आवश्यक झाली आहे. या दृष्टीने रेशीम उद्योग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळवून देईल असे, प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. 

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात डॉ.विपिन इटनकर यांच्या हस्ते रेशीम रथास हिरवी झेंडी दाखवून महा रेशीम अभियान 2021 चे उद्घाटन झाले. यावेळी मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी पी.पी.कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आर.बी.चलवदे, रेशीम विकास अधिकारी श्रीमती. ए.व्ही. वाकूरे, नायब तहसिलदार सुनिल माचेवाड आदि उपस्थित होते. 

रेशिम विभाग व कृषी सहाय्यक यांच्या मदतीने जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करुन घेवुन रेशीम शेती तसेच मनरेगा, पोकरा, आत्मा ई. सारख्या योजना शेवटच्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधिताना दिले. शासनाच्या वस्त्रोद्योग व रेशीम संचालनालयाच्या अंतर्गत रेशीम शेतीबाबत जागृती करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाच्यावतीने 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात महा रेशीम अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी माहितीने सुसज्ज रेशीम रथ तयार करण्यात आला आहे. रेशीम शेतीविषयी सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी रेशीम रथासोबत रेशीम अधिकारी, तज्ञ कर्मचारी विविध गावांत जावून मार्गदर्शन करणार आहेत. 

रेशीम शेतीत कामाची मजुरी देणार शासन- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तुती लागवड व जोपासना मजूरी व साहित्य खर्चा पोटी तीन वर्षात टप्पेनिहाय 2 लाख 13 हजार 10 रुपये तर किटक संगोपनगृह बांधण्यासाठी 1 लाख 13 हजार 780 रुपये असे एकूण 3 लाख 26 हजार 790 रुपयांचे अनुदान देण्यात येते. या योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय,नवा मोंढा नांदेड येथे नोंदणी करावी अथवा 02462-284291 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असेही, रेशीम विकास अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे. या कार्यक्रमास नायब तहसिलदार गिरीश सर्कलवाड, सहाय्यक लेखाधिकारी सतिश देशमुख, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सहदेव वाघमोडे, प्रसाद डूबूकवाड, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ए.जे.कारंडे, पी.एस.देशपांडे, टि.ए.पठाण, एस.जी.हनवते, पी.यु.भंडारे, एस.पी.इंगळे, एन.वाय. कोरके, ए.एन.कुलकर्णी, के.के.मेहकरकर, गणेश नरहिरे, रावसाहेब पोहरे,संतोष निलेवार,गोपाळ धसकनवार, बालासाहेब भराडे यांची उपस्थिती होती.

00000




No comments:

Post a Comment

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

  76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण     नांदेड, दि. 25 जानेवारी :- ...