Tuesday, February 16, 2021

 *शालेय वाहनांच्या चालक व मालक यांच्यासाठी प्रबोधन* ▪️प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपक्रम


नांदेड, (जिमाका) दि. 16:-  रस्ते वाहतूक नियमांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने  राबविण्यात येणाऱ्या अभियानाच्या निमित्ताने जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालक व मालक यांच्यासाठी प्रबोधन पर शिबिर 10  फेब्रुवारी 2021 रोजी संपन्न झाले. 
यावेळी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्या दृष्टीने स्कूल बस चालकांना वाहतूकविषयक नियमांचे व परिवहन विभागाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याबाबत व विद्यार्थ्यांची आसनक्षमतेपेक्षा जास्त वाहतूक न करण्याविषयी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील रस्ते अपघात व त्याद्वारे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने 32 वे रस्ते सुरक्षा अभियान 2021 हे 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत जिल्हाभर राबविले जात आहे. 
या उपक्रमांतर्गत एक भाग असलेल्या
या प्रबोधन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव हे उपस्थित होते. या कार्यक्रमास स्कूलबस संघटनेचे  निखिल लातूरकर, ऑटो रिक्षा संघटनेचे अहमद बाबा व जिल्ह्यातील स्कूल बस, व्हॅनचालक व मालक यांची उपस्थिती होती.
यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव यांनी रस्ते अपघात कमी करण्याच्या दृष्टीने सर्व वाहनचालकांनी आपली जबाबदारी ओळखून रस्त्यांवर वाहन चालवताना काळजी घेण्याचे व रस्ते अपघातातील जखमींना मदत करण्याविषयी उपस्थितांना आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच बोंढारे पीयूसी सेंटरचे ओम बोंढारे यांनी परिश्रम घेतले.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...