Tuesday, January 26, 2021

 

समाजमनाला योग्य मार्गाने प्रवाहित करण्यात

साहित्यिक, विचारवंत, कलावंतांचे योगदान मोलाचे

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड, (जिमाका)दि. 26 :- विचारवंतांची उपलब्धता ही राज्याची वैचारिक पातळी दर्शवित असते म्हणून लेखक, कवी, निर्मिती क्षेत्रातील कलावंत आणि दिग्दर्शकांनी देशात काय चालले आहे, याकडे गांभीर्याने लक्ष ठेऊन समाजमन योग्य दिशेने प्रवाहित करण्याचे काम करावे, असे आवाहन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज केले.  

नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने मंगळवार 26 जानेवारी रोजी येथील कुसुम सभागृहात सावित्रीबाई फुले व नरहर कुरुंदकर पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा मंगराणी अंबुलगेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या कार्यक्रमात आ. अमरनाथ राजूरकर, आ. बालाजी कल्‍याणकर, आ. मोहनराव हंबर्डे, आ. श्‍यामसुंदर शिंदे, महापौर मोहिनी येवनकर, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, माजी आमदार वसंत चव्‍हाण, हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा तथा आरोग्‍य सभापती पद्मा नरसारेड्डी सतपलवार, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, समाजकल्‍याण सभापती रामराव नाईक, महिला व बाल विकास सभापती सुशीलाताई हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माध्‍यमिक शिक्षणाधिकारी बालासाहेब कुंडगीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्‍हा परिषद सदस्‍य प्रकाश भोसीकर, साहेबराव धनगे, लक्ष्‍मण ठक्‍करवाड, गोविंदराव नागेलीकर आदींची उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना अशोक चव्हाण पुढे म्हणाले, या देशात सामाजिक परिपक्व नेतृत्व नसेल तर तो देश नेतृत्वहीन होतो आणि वैचारिक गोंधळ निर्माण होतो. यातून अनपेक्षित गोष्टी घडत जातात. चुकीच्या विचारांच्या हातात सत्‍ता गेली की, असे घडत असते, जसे की, बलाढय आशा अमेरिकेत घडले आहे. म्हणून देशात अराजकता दिसत आहे. हे चित्र चांगले नाही. सुदृढ लोकशाहीस याबाबी मारक आहेत. त्यामुळे विचारवंत, लेखक व कवींनी अधिक जागरूक राहून लेखन करणे व समाजाला दिशा देणे गरजेचे आहे. पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात मोलाचे काम केले असून यापुढेही त्यांनी अविरतपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सावित्रीबाई फुले पुरस्काराने  संध्याताई दत्तात्रेय बारगजे व बेबीसुरेखा मनोहर शिंदे यांना तर नरहर कुरुंदकर पुरस्काराने डॉ. सुरेश सावंत व आशा पैठणे यांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह, ग्रंथ, शॉल, पुष्‍पहार व दीड लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. 

प्रारंभी क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले व कै. नरहर कुरुंदकर यांच्‍या प्रतिमेचे पुजन करुन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते दीप प्रज्‍वलन करण्‍यात आले. त्‍यानंतर आनंदी विकास व संच यांनी स्‍वागत गीत सादर केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी पुरस्‍कार प्राप्‍त मान्‍यवरांचे अभिनंदन करुन त्‍यांच्‍या भावी कार्यास शुभेच्‍छा दिल्‍या. 

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी केले. यावेळी पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमस्थळी शैक्षणिक स्टॉल उभारण्यात आले होते. बालासाहेब कच्‍छवे यांची मेंदूची व्यायाम शाळा हा एक नावीन्यपूर्ण प्रयोग याठिकाणी मांडण्यात आला होता. या स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्‍यंकटेश चौधरी तर उपस्थितांचे आभार शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्‍हयातील साहित्‍यप्रेमी यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, दत्तात्रेय मठपती, माधव सलगर, रुस्तुम आडे, दीपक महालिंगे, पद्माकर कुलकर्णी, अधीक्षक बळीराम येरपूलवार, लेखाधिकारी अमोल आगळे, डॉ. विलास ढवळे, दादाराव शिरसाट, शिवाजी नाईकवाडे, विलास कोळनूरकर, प्रवीणा मांदळे, राजेश कुलकर्णी आदींने परिश्रम घेतले.

000000






No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...