नाताळ सणाच्या गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना
नांदेड, (जिमाका) दि. 24 :- दरवर्षी ख्रिश्चन बांधव नाताळचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. परंतू कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी सर्व धर्मीय सण / उत्सव हे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आले आहेत. त्याच पद्धतीने ख्रिश्चन बांधवांनी नाताळचा सण साजरा करणे अपेक्षित असल्याने त्यादृष्टिने राज्याच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे.
या मार्गदर्शक सूचनांमध्ये ख्रिश्चन बांधवांनी यावर्षीचा नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये जास्तीतजास्त 50 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल याची काळजी घेण्यात यावी. चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. नाताळ सणाच्या दिवशी चर्चमध्ये येशुंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री अगर काही वसतू ठेवल्या जातात. त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. चर्चमध्ये प्रभु येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत (Choir) गाण्यासाठी जास्तीत जास्त 10 गायकांचा समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करुन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. चर्चच्या बाहेर व परिसरात दुकाने / स्टॉल लावण्यात येऊ नयेत. साठ वर्षावरील नागरिकांनी तसेच 10 वर्षाखालील बालकांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे व सण घरामध्येच साजरा करावा. आयोजकांनी त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची सुविधा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी. सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षति होणार नाही अशा धार्मिक / सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये. फटाक्यांची अतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदीचे काटकोर पालन करण्यात यावे. 31 डिसेंबर रोजी चर्चमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रार्थना ही मध्यरात्री आयोजित न करता संध्याकाळी 7 वाजता किंवा त्यापूर्वी घेण्याचे नियोजन करण्यात यावे.
कोविड-19 या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित
महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन
करणे बंधनकारक राहील. तसेच गृह विभागाच्या या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष नाताळ
उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे
देखील अनुपालन करावे लागेल, असे परिपत्रक राज्य शासनाच्या गृह विभागाचे उप सचिव
संजय खेडेकर यांनी निर्गमीत केले आहे.
0000
No comments:
Post a Comment