Saturday, December 5, 2020

सहकाऱ्याच्या निरोप समारंभात

जेंव्हा माझी विद्यार्थ्यांसह निवृत्त कर्मचारीही गलबलून जातात ! 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- येथील शासकीय आयटीआयच्या प्रशिक्षण संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडविणारे सभागृह ! शेजारी अनेक दशकांपासून या परिसरात सावली देणारी तेवढीच जुने वृक्ष व स्वच्छ असलेला विस्तीर्ण परिसर. लॉकडाऊनच्या खंडानंतर अनेक दिवसांनी विद्यार्थी, शिक्षक, माजी कर्मचारी, माजी विद्यार्थी यांच्या उपस्थितीने गलबलून जातो. याला निमित्त असते सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रिय असलेल्या रमेश केंद्रे या गटनिदेशकांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेला एक छोटेखानी समारंभ. 

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेत 40 मिनिटांसाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम अडीच तासांचा केंव्हा होतो हे कुणाचा लक्षातही येत नाही. माझी विद्यार्थ्यांसहित सर्वजण एक-एक आपल्या आवडत्या केंद्रे सरांच्या आठवणींचा एक-एक कप्पा काढतात. बऱ्याचश्या कप्प्यांमध्ये हळव्या आठवणी असल्याने सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा केंव्हा ओल्या होतात याचेही भान राहत नाही. एखादा कर्मचारी केवळ नोकरी म्हणून काम न करता त्या संस्थेच्या कर्तव्यासह तेथील भोवतालाचाही भाग म्हणून जेंव्हा काम करतो तेंव्हा त्या व्यक्तीच्या निरोपाला तेथील परिसरही स्तभ झाला नसेल तर नवलच. 

केंद्रे सरांच्या सेवेतले महत्वपूर्ण योगदान म्हणजे ज्या शासकिय प्रशिक्षण संस्थेसाठी त्यांनी आपली सेवा दिली, ज्या विषयाच्या अध्यापनाला सेवा दिली त्याविषयाचे आध्यापक करतांना त्याची उपयोगिता संस्थेच्या परिसरातही कार्यालयीन वेळ संपल्यानंतर कशी देता येईल त्यादृष्टिने केलेले कार्य. शहराच्या मध्यवर्ती आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या संस्थेच्या जागेबाबत सातबाऱ्यावर जी नोंद आहे त्यात दोन एक जागेचा फरक होता. शासकिय कागदपत्रात 9 एकर तर सातबाऱ्यावर 7 एकर ही स्थिती पाहून संस्थेच्या प्राचार्यांसह केंद्रे यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करुन ती सर्व जागा संस्थेला मिळवून घेतली. अध्यापनाच्या क्षेत्राव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या अंगी योगाचे संस्कार व्हावेत, उर्वरीत वेळेत समाजासाठी आपली कर्तव्य भावना लक्षात घेऊन त्यांनी नांदेड जिल्ह्यातील भारतीय योग विद्याधाम शाखेच्या उपाध्यक्ष पदासह कोरोनाच्या काळात समाजामध्ये सुदृढ आरोग्यासाठी योगा या मोहिमेलाही आकार दिला. 

एरवी शासकिय नोकरीत सुट्ट्यांचे गणित डोळ्यासमोर ठेवून सेवा देणारे आणि सुट्ट्यांच्या दिनदर्शिकेपलिकडे शासकिय कर्तव्य चोखपणे बजावत समाजासाठी आपली कर्तव्याची भावना ठेवून उर्वरित वेळेत सार्वजनिक हिताच्या उपक्रमासाठी वेळ देणे हे आजच्या काळात दुर्लभच. त्यांच्या या निरोप समारंभात जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, संस्थेचे प्राचार्य एम. बी. कुलकर्णी, उपप्राचार्य एस. एस. परधने, प्रबंधक श्रीमती वाय. बी. राठोड, प्राचार्य एम. एस. बिराजदार, प्रा. गुरुबच्चन सिंघ, प्रा. डॉ. पांडुरंग तिडके, स्वा.रा.ती.म.विद्यापिठाचे वित्त अधिकारी गोविंदराव कतलाकुट्टे यांनी केंद्रे यांच्या कार्याचा गौरव केला नसेल तर नवलच.  

0000



No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...