Saturday, November 21, 2020

 

शासकिय कर्मचारी विरोधातील अर्ज मागे घेण्यासाठी 

खंडणी स्विकारतांना एकाला रंगेहात पकडले 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- नांदेड तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागातील अव्वल कारकुन प्रेमानंद लाठकर यांच्या विरोधात खोट्या तक्रारी देणाऱ्या बालाजी जोगदंड या व्यक्तीने खंडणीसाठी तगादा लावला होता. लाठकर यांच्यावर खोटे आरोप करीत बदलीचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात देऊन बालाजी जोगदंड याने लाठकर यांना मोठ्या रक्कमेची मागणी करत तगादा लावला होता. त्याच्या छळाला कंटाळून लाठकर यांनी  वजिराबाद पोलिस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिल्यानंतर जोगदंड याला सापळा रचून 5 हजार रुपयाची खंडणी स्विकारतांना व्हीआयपी रोड नांदेड येथे पंचासमक्ष ताब्यात घेतले. याबाबत नांदेडचे तहसिलदार किरण अंबेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.    

अव्वल कारकुन प्रेमानंद लाठकर यांची तात्काळ बदली करण्यात यावी यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात बालाजी जोगदंड याने अर्ज केला होता. त्‍यानंतर लाठकर यांना जोगदंड हा वारंवार मोबाईलवर कॉल करुन तुमच्या विरोधातील अर्ज मागे घेतो मला गाडी घ्‍यावयाची आहे, तुम्‍ही मला भेटा फोनवर बोलता येत नाहीत, असे वारंवार भेटण्‍यासाठी बोलवत होता. अप्रत्‍यक्षरित्‍या जोगदंड हा पैशाची मागणी करत असल्याने लाठकर यांनी पोलीस स्‍टेशन वजीराबाद नांदेड येथे त्याच्या विरुद्ध 19 नोव्हेंबर रोजी तक्रार दिली होती.   

लाठकर यांना 20 नोव्हेंबर रोजी बालाजी जोगदंडचा कॉल येऊ लागल्‍याने लाठकर यांनी त्‍याला थोड्यावेळाने येतो असे म्‍हणून टाळाटाळ केली. त्‍यांनतर लाठकर यांनी पोलीस स्‍टेशनला याबाबतची माहिती देवून कार्यवाही करण्‍याबाबत विनंती केली. याच दरम्यान बालाजी जोगदंडचा कॉल येत असल्याने लाठकर यांनी त्‍याचा कॉल उचलून त्‍याच्याशी बोलत असता त्‍याने नांदेड जिल्‍हा परिषदेच्या इमारत परिसरातील गोकुळ ज्‍युस सेंटर येथे एकटेच या असे सांगीतले. त्‍यावेळी सहपोलीस निरीक्षक श्री. मरे यांनी दोन पंचांना बोलावून पंचासमक्ष लाठकर यांच्याकडील भारतीय चलनातील पाचशे रुपयाच्या 10 नोटाचे क्रमांक लिहुन पंचनामा केला. त्‍यानंतर आशिष अंबोरे व बिरादार हे एक पंच सुरुवातीला गोकूळ ज्‍युस सेंटर येथे जावून बसल्यानंतर पाच ते दहा मिनीटांनी लाठकर पोहचल्यानंतर काही वेळात बालाजी जोगदंड तेथे आला व लाठकर यांना बाजुला घेवून बाहेर जावू असे सांगितले. त्‍यावेळेस लाठकर यांच्या दुचाकीवर बालाजी जोगदंडच्या सांगण्याप्रमाणे हिंगोलीगेट अण्‍णा भाऊ साठे चौक व्हीआयपी रोडवरील मराठवाडा अॅक्‍टो कन्‍सल्‍टन्‍सी येथे गाडी थांबविण्‍यास त्याने सांगीतले. त्‍यावेळी पंच व पोलीस पथक हे पाठीमागे येतच होते. लाठकर यांनी गाडी बाजूला लावुन त्‍याच्यासोबत बोलत असतांना लाठकरचा अर्ज मागे घेण्‍यासाठी जोगदंडने पैशाची मागणी केली. त्‍यावेळी लाठकर यांनी यांच्याकडील पांढऱ्या कागदात ठेवलेल्‍या भारतीय चलनातील पाचशे रुपयाच्या 10 नोटा एकुण 5 हजार रुपये जोगदंड जवळ दिले  तेंव्हा जोगदंडने ते स्‍वतःच्‍या शर्टच्‍या खिशात ते ठेवले. तेंव्हाच सहपोलीस निरीक्षक श्री. मरे यांनी पंचासमक्ष सदर रक्कम जप्‍त केली. बालाजी जोगदंड याने पैशाची मागणी केल्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी असा जबाब श्री. लाठकर यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिला आहे, अशी माहिती नांदेड तहसिलदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...