इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा
2 डिसेंबरपासून सुरु होणार
नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यातील कोविडची स्थिती, त्यादृष्टीने शाळा सुरु करताना करावयाचे नियोजन, शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या आणि त्याचे अहवाल येण्यासाठी लागणारा वेळ या बाबींवर आम्ही प्राधान्याने लक्ष केंद्रित केंद्रीत केले. सर्व परिस्थितीचा विचार करून जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या 23 नोव्हेंबर रोजी सुरु होणाऱ्या शाळा आता स्थगित करण्यात आल्या असून त्या 2 डिसेंबरपासून सुरु करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी संयुक्त दिलेल्या प्रसिद्धी पत्राद्वारे स्पष्ट केले.
नांदेड जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीच्या 858 शाळा असून त्यात जिल्हा परिषदेच्या 70 शाळा आहेत. इयत्ता नववी ते बारावीला शिकवणारे जिल्हा परिषद व खाजगी शाळांचे असे एकूण 8 हजार 115 शिक्षक आहेत. शाळा सुरु होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले. शिक्षकांचे नाव, त्यांची तपासणी तारीख व ठिकाण निश्चित करुन अशा याद्या महानगरपालिका व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे देण्यात आल्या होत्या.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी शाळारंभाची पूर्वतयारी यासंदर्भाने डायटचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थिती जाणून घेतली. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर आणि डायटचे प्राचार्य रवींद्र अंबेकर यांनी शाळा सुरु करण्याच्या पूर्वतयारीबाबत माहिती दिली. शिक्षण समितीच्या सभेतही शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी शाळा सुरु करण्याच्या पूर्वतयारीबाबत सूचना केल्या होत्या.
जिल्ह्यातील 2 हजार 282 शिक्षकांची अँटीजन टेस्ट करण्यात आल्या असून 4 हजार 982 शिक्षकांची तपासणी करणे सुरु आहे. यापैकी 927 जणांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. तर 2 हजार 702 जणांची चाचणी सुरु आहे. आतापर्यंत 40 टक्के शिक्षकांची तपासणी पूर्ण झाली आहे. उर्वरित तपासणी करुन घेण्यात येत आहे.
येत्या 1
डिसेंबरपर्यंत सर्व स्थिती सुरळीत करून 2 डिसेंबरपासून
शाळा सुरु करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा
मंगाराणी अंबुलगेकर, सभापती संजय बेळगे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले आहे.
*****
No comments:
Post a Comment