Thursday, October 29, 2020

सुधारित वृत्त

 

शेतकऱ्यांना ऊसाचा मोबदला

अधिकाधिक कसा मिळेल यासाठी कटिबद्ध

- पालकमंत्री अशोक चव्हाण 

भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना लि. लक्ष्मीनगरच्या रौप्य महोत्सवी

गळीत हंगामाचा डॉ. विश्वजीत कदम व मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- मागील 24 वर्षे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने इथल्या शेती आणि शेतकऱ्यांप्रती जी विश्वासार्हता जपली त्याच विश्वासार्हतेच्या बळावर आपण कारखान्याच्या रौप्य महोत्सवी गळीत हंगामाचा शुभारंभ केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या योगदानातून हा कारखाना आजवर विविध गुणवत्तेसह सुरु आहे. शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त चांगला दर कसा मिळेल यासाठी आम्ही विश्वस्त या नात्याने अधिक कटिबद्ध असून सदैव प्रयत्नशील राहून असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. ते भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना लि. लक्ष्मीनगरच्या रौप्य महोत्सवी गळीत हंगाम शुभारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. 

या गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी राज्याचे सहकार, कृषि, सामाजिक न्याय, अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ आणि मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, महापौर सौ. मोहिनी येवनकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके, उपाध्यक्ष कैलास दाड आदींची यावेळी उपस्थिती होती.   

केवळ साखरेच्या उत्पादनावर साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी अधिक पैसे मिळतील अशी स्थिती आता राहिली नाही. शेतकऱ्यांना, भागधारकांना ऊसाचा योग्य दर देण्यासाठी इतर बायोप्रोडक्टची जोड द्यावी लागणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण 30 हजार लिटर इथेनॉलचा प्रकल्प सुरु केला आहे. यात आता वाढ करुन तो प्रकल्प दुप्पटीने मोठा म्हणजेच 60 हजार लिटर क्षमतेचा करीत असल्याची घोषणा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. सहकारी साखर कारखान्यांच्याबाबतीत अलिकडच्या काळात ऊसासाठी जे दर बांधून दिले तेच दर साखरेसाठी जर बांधून दिले असते तर शेतकऱ्यांचा आजवर अधिक फायदा झाला असता. केंद्र सरकारच्या निदर्शनास आम्ही याबाबी आणून दिल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

जिल्ह्यातील रस्ते विकासासमवेत इतर विकासाच्या कामांवरही भर दिला आहे. यात सुमारे 153 कोटी रुपयांची जिल्हा न्यायालयाची इमारत, भोकर येथे 12 कोटी रुपयांची न्यायालयीन इमारत, तांडा विकास निधी आदी विविध विकास कामांवर भरीव तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विम्याबाबत असलेल्या अडचणी व तापमान नोंदीतील कार्यपद्धतीमुळे होणारे नुकसान याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टिने स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी अप्पर पैनगंगा विष्णुपूरी सारखे मोठे प्रकल्प आकारास घातले. यावर्षी सर्वत्र भरपूर पाऊस झाल्याने शंभर टक्के धरणे भरली आहेत. आता शेतकरी रोटेशनचे नावही घ्यायला तयार नाहीत  एवढे पाणी आहे. सर्वांजवळ मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी आता गुणवत्तापूर्ण शेती उत्पादनाकडे वळले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या अतीवृष्टीत राज्यातील रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नुकतेच दहा हजार कोटींचे पॅकेज दिले आहे. यात 2600 कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून राज्यातील विविध कामांसह जिल्ह्यातील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण करु असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सूचित केले. 

भाषणाच्या सुरवातीला त्यांनी स्व. डॉ. शंकरराव चव्हाण व स्व. पतंगराव कदम यांच्या स्मृतींना उजाळा दिला. डॉ. विश्वजीत कदम यांनी पतंगराव कदम यांचा वारसा समर्थपणे चालविला असून त्यांच्या कामाची कार्यपद्धती अतिशय चांगली असून या युवा नेत्याचे मराठवाड्याकडून कौतूक व्हावे, त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी त्यांना मी निमंत्रण दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझा युवा सहकारी म्हणून मला अभिमान असल्याचेही त्यांनी गौरोउद् गार काढले. 

इथल्या कृषिक्षेत्रावर स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे मोठे ऋण आहेत. त्यांनी शेतीसाठी विविध प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करुन दिले. पाणी उपलब्ध झाल्याने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समृद्धता साध्य करता आली. अशोक चव्हाण यांनीही त्यांची धुरा समर्थपणे सांभाळली असून माझ्या सारख्या अनेक युवा नेतृत्वाला त्यांनी घडविल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.  

शेतीतील उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल तर ठिबक शिवाय पर्याय नसल्याचे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना उच्च कृषि तंत्रज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याचे शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रारंभी आमदार अमर राजूरकर व कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके यांनी मनोगत व्यक्त केले.

00000

 






 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...