Monday, October 5, 2020

 

नांदेड कौठा येथे 30 एकरवर

आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्यावत क्रीडा संकुल  

-         पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड (जिमाका) दि. 5 :-जिल्ह्यातून विविध क्रीडा प्रकार, खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू तयार व्हावेत यासाठी त्यांना चांगल्या क्रीडा संकुलाची नितांत आवश्यकता आहे. जिल्ह्यातील क्रीडापटूंना यासाठी आता जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. युवकांना क्रीडा सुविधांसह चांगले प्रशिक्षकही मिळावेत यासाठी आग्रही भुमिका मांडत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कौठा येथे 30 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय आज जाहिर केला.   

क्रीडा संकुल विकासाबाबत आज नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब कदम रावणगावकर, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार उपस्थित होते.  

नांदेड येथे विविध खेळांसाठी एक अद्ययावत असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिल्हा क्रीडा संकुल असावे अशी अनेक दिवसांपासून विविध क्रीडा संघटना, खेळाडू, क्रीडाप्रेंमीची मागणी होती. ही मागणी विचारात घेऊन आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी निर्णय घेतला. सद्यस्थितीत नांदेड शहरात अद्ययावत क्रिकेटच्या स्टेडिअमचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. या कामाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. क्रिकेटसमवेत इतर खेळांच्या विविध स्पर्धा व  सरावासाठी स्वतंत्र जिल्हास्तरावरील नवीन स्टेडिअम जिल्ह्यातील ग्रामीण खेळाडूंना नवी दिशा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

नवीन कौठा येथे तीस एकर जागेमध्ये आता हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल आकार घेईल. यात सिन्थेटिक ॲथलेटिक्स मैदान, स्विमिंगपूल, बॅटमिंटन हॉल, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, जिमनॅस्टिकसाठी हॉल, ज्यूदो कराटे, पॉवर लिफ्टींग, बास्केट बॉल, स्केटिंग, आर्चरी, तॉयक्कोंदो, कुस्ती अशा विविध खेळांचे अद्ययावत व प्रमाणित आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान असतील. याचबरोबर क्रीडापटूंच्या अंगी आंतराष्ट्रीय दर्जाचे कसब यावे यादृष्टिने नियमित सराव शिबीर स्पर्धा घेण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक सेवासुविधांचाही समावेश राहिल.    

नवीन शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील क्रीडा विकासाबाबत आता स्वतंत्र समिती तयार करण्यात आली असून या समितीचे पदसिद्ध अध्यक्षपदी पालकमंत्री अशोक चव्हाण यांची नियुक्ती केली. सदर तीस एकर जागा या नवनिर्मित जिल्हा क्रीडा संकुलासाठी तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबत योग्यती प्रक्रिया करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिले. यात आवश्यकता भासल्यास मनपाने योग्य ती मदत करण्याबाबत आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनाही सांगितले. जागेची पाहणी करुन नियोजित आराखडा तात्काळ तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शासकीय क्रीडा संकुल याचे व्यवस्थापन व त्याची निगा घेण्यासाठी व्यावसायिक तत्वावर विचार करण्याशिवाय पर्याय नाही. पुणे, मुंबई येथे विविध खेळांचे क्लब व तेथील व्यवस्थापन लक्षात घेता त्याच धर्तीवर नांदेड येथील हे क्रीडा संकुल राहील असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

याप्रसंगी स्टेडियम व्यवस्थापक रमेश चवरे, किशोर पाठक, डॉ. मनोज पैजणे, डॉ. आश्विन बोरीकर, प्रलोभ कुलकर्णी, विक्रांत खेडकर, जयपाल रेड्डी, बालाजी जोगदंड, प्रविण कुपटीकर, मंगेश कामतीकर, अलीम खान, इम्रान खान, प्रा. इंम्तियाज खान, रविकुमार बळवाड यावेळी आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या निर्णयाचे स्वागत विविध क्रीडा संघटना, पदाधिकारी, खेळाडू, क्रीडाप्रेमी यांनी केले व तात्काळ पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा सत्कार देखील केला. 

0000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...