Saturday, September 5, 2020

 स्टार्टअप्स उद्योजकता जागृती अभियानाविद्यार्थ्यांचा सहभाग

नांदेड (जिमाका) दि. 5 :- राज्यभरातील तंत्रनिकेतने, अभियांत्रिकी आणि अन्य शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांसाठी अवेअरनेस क्विझ ऑन आंत्रप्रेनरशिप अँड स्टार्टअप्स या नाविन्यपूर्ण ऑनलाईन प्रश्नमंजूषेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाने प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली हे राज्यस्तरीय जागृती अभियान राबवले आहे.

देशाच्या स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने उद्योजकता आणि स्टार्टअप्स यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थीदशेतच उद्योजकता आणि स्टार्टअपबाबतच्या विचाराचे बीजारोपण व्हावे आणि जिज्ञासा निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजिलेल्या या उपक्रमास विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. राज्यातील विविध शासकीय खाजगी अभियांत्रिकी संस्था, तंत्रनिकेतने आणि व्यवस्थापन शाखेच्या एकूण 1 हजार 500 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला होता. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना -प्रमाणपत्रे देण्यात आली.

उपक्रम संकल्पना संयोजक म्हणून विभाग प्रमुख राजीव सकळकळे आणि समन्वयक म्हणून ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. संतोष चौधरी यांनी जबाबदारी पार पाडली. बदलत्या परिस्थितीत नवनवीन आव्हानांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था असे अभिनव उपक्रम सातत्याने राबवत आहे, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी दिली. तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया  सुरु असताना विद्यार्थी आणि पालक यांच्या दृष्टीने सदर उपक्रम उल्लेखनीय ठरतो.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...