Saturday, September 19, 2020

 

शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीची तक्रार  

72 तासाच्या आत विमा कंपनीकडे नोंदवावी   

नांदेड, (जिमाका) दि. 19 :- प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अतिवृष्टी व पूर परस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची तक्रार विमा कंपनीला 72 तासाच्या आत करणे बंधनकारक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची पिकांच्या नुकसानीची माहिती तात्काळ विमा कंपनीकडे नोंदवावी असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.   

जिल्ह्यात 15 ते 19 सप्टेंबर दरम्‍यान काही मंडळात अतिवृष्‍टी झाली असून काही ठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शासन निर्णय 29 जून 2020 नुसार ज्‍या शेतकऱ्यांनी पिकाचा विमा भरलेला आहे त्‍या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे झालेल्‍या पिकाच्या नुकसानीची तक्रार विमा कंपनीला 72 तासाच्‍या आत कळविणे बंधनकारक आहे. 

बऱ्याच शेतकऱ्यांना विमा कंपनीस सूचना देण्‍याची पद्धत माहिती नसल्‍यामुळे शेतकरी या नुकसानीची तक्रार विमा कंपनीस करत नाहीत. त्‍यामुळे नुकसान भरपाई मिळण्यापासून शेतकरी वंचित राहतात. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी अशाप्रकारे अतिवृष्टी किंवा पूर परिस्‍थीतीमुळे पिकांचे नुकसान होत असेल तर पुढीलप्रमाणे विमा कंपनीला तक्रार नोंदवावी. यासाठी शेतकऱ्यांना 18001035490 या टोल फ्री नंबरवर तक्रार नोंदवता येईल. कंपनीच्‍या ई-मेल आयडी suportagri@iffcotokio.co.in वर तक्रार नोंदवता येईल. क्रॉप इन्शोरन्‍स अॅपद्वारे ही तक्रार नोंदवता येईल. तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी अर्ज देऊन तक्रार नोंदवता येईल. याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...